Latest

Ruturaj Gaikwad Troll : टीम इंडियात स्थान मिळूनही ऋतुराज गायकवाड ट्रोल का होतोय?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ruturaj Gaikwad Troll : केवळ आयपीएल कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाची निवड होणार का? असा संतप्त सवाल उपस्थित करून चाहत्यांनी बीसीसीआयच्या निवड समितीला धारेवर धरले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. त्यात मुंबईच्या रणजी संघाचा खेळाडू सर्फराज खानला संधी देण्यात आली नसल्याचे समोर येताच क्रिकेटच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियातून नाराजी व्यक्त केली आहे.

रणजी ट्रॉफीच्या मागील 3 मोसमात सरफराज खानने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याच्या इतक्या धावा दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाला करता आलेल्या नाहीत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने खळबळ माजवणाऱ्या सरफराजची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. मात्र आतापर्यंत त्याची एकदाही भारताच्या कसोटी संघात निवड झालेली नाही. सर्फराजने आपल्या कारकिर्दीत 37 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3505 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याची सरासरी 80 च्या आसपास आहे. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर सर्फराजला संधी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात होते पण शुक्रवारी जेव्हा संघाची घोषणा करण्यात आली तेव्हा त्यात त्याचे नाव नव्हते. निवड समिती जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. केवळ आयपीएल कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाची निवड होणार का? असे मत व्यक्त करून चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Ruturaj Gaikwad Troll)

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 च्या फायनलमध्ये पराभवाचा फटका काही खेळाडूंना बसेल अशी अपेक्षा होती, तसंच काहीसं घडलं. चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे, तर अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. मोहम्मद शमीलाही वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. यशस्वी जैस्वालचा कसोटी संघात समावेश होणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती, मात्र ऋतुराज गायकवाडला कसोटी संघात पाहून चाहते संतापले आहेत. खरंतर सर्फराज खानचा कसोटी संघात समावेश न करणे हे नाराजीचे कारण आहे. (Ruturaj Gaikwad Troll)

गायकवाड आणि जैस्वाल या दोघांनीही अलीकडेच आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली. सर्फराजशिवाय चाहत्यांनी प्रियांक पांचाल आणि अभिमन्यू ईश्वरनबद्दलही ट्विट केले आहे. रोहित शर्मा सध्या कर्णधार आहे, पण वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर तो कसोटी कर्णधारपद सोडू शकतो, असे मानले जात आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

भारताला वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर, तर दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळवला जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT