Latest

संरक्षण खात्यातून ‘विंडोज’ हद्दपार; भारताने बनवली ‘माया’ ऑपरेटिंग सिस्टीम

अमृता चौगुले

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था :  येणारा काळ सायबर युद्धाचा असल्याने त्यात शत्रूंना पुरून उरण्याची पूर्ण तयारी भारताने केली आहे. डीआरडीओ, सी डॅक आणि एनआयसीतील तज्ज्ञांच्या मदतीने संरक्षण खात्याने 'माया' ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली असून त्यामुळे लवकरच सरकारी संगणकांतून मायक्रोसॉफ्टची 'विंडोज' ही ऑपरेटिंग सिस्टीम हद्दपार होणार आहे. यात 'चक्रव्यूह' हे व्हायरस आणि मालवेअरना ओळखून त्यांचा सफाया करणारे सॉफ्टवेअरही आहे. यामुळे भारतावरील सायबर हल्ले करणार्‍या हॅकर्सना आता शासकीय संगणकांत घुसखोरी करणे अशक्य होणार आहे.

'माया' ही एक नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ती उबंटूवर आधारित असून लिनक्स प्रणालीचा वापर करून संरक्षण मंत्रालयाने 'माया' विकसित केली आहे. या कामात डीआरडीओ, सी डॅक आणि एनआयसी या शासकीय तज्ज्ञ संस्थांच्या संगणक तज्ज्ञांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

15 ऑगस्टनंतर वापर सुरू

सध्या चाचणी पातळीवर 'माया'ची तपासणी केली जात आहे. त्यातून तावून सुलाखून निघाल्यावर साऊथ ब्लॉकमधील इंटरनेट
कनेक्टिव्हिटी असणार्‍या सर्व संगणकांवर ही ऑपरेटिंग सिस्टीम लोड केली जाईल. त्यात 'चक्रव्यूह' हे सॉफ्टवेअरही असेल. या वर्षअखेरीपर्यंत सर्व शासकीय संगणक 'माया' वापरायला सुरुवात करतील.

गरज का भासली?

2021 मध्ये भारताच्या विविध सरकारी विभागांच्या संगणकांवर हॅकर्सनी अनेक हल्ले केले होते. त्यांनी देशाच्या पायाभूत क्षेत्रासह संरक्षणासारख्या महत्त्वाच्या विभागांतही घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने पुढाकार घेत भारताची स्वतःची अतिशय सुरक्षित आणि विंडोजपेक्षा अधिक विश्वासार्ह ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्याचा निर्णय घेतला. डीआरडीओ, सी डॅक आणि एनआयसीमधील अतिशय हुशार, तल्लख आणि कुशाग्र अभियंत्यांनी तब्बल सहा महिने मेहनत घेत ही ऑपरेटिंग सिस्टीम बनवली. ही यंत्रणा चांगली असल्याचे शिफारसपत्र नौदलाने वापर करून दिले आहे तर सध्या लष्कर आणि हवाई दल त्याची पडताळणी करीत आहेत.

हॅकर्सच्या निशाण्यावर भारत

भारताची सर्वच आघाड्यांवर घोडदौड सुरू झाल्याने जळफळाट करणार्‍या शेजारी शत्रूंनी भारतावर सातत्याने सायबर हल्ले चढवले आहेत. 2019 साली कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाची संगणक यंत्रणा भेदण्याचा प्रयत्न झाला होता. 2020 मध्ये मुंबईच्या पॉवर ग्रीडची यंत्रणा हॅकर्सनी जवळपास भेदलीच होती. 2022 मध्ये ऑईल इंडिया लिमिटेड, स्पाईस जेटचे सर्व्हर आणि एम्सची संगणक यंत्रणा हॅकर्सनी टार्गेट केली होती.

फायदा काय?

  • बरीचशी रचना विंडोजसारखी असल्याने हाताळण्यास सोपी
  • मालवेअर व व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी त्यातच 'चक्रव्यूह' हे सॉफ्टवेअर
  • वापरकर्ता आणि इंटरनेट यांच्यात सुरक्षा कवच म्हणून 'चक्रव्यूह' काम करते
  • 'चक्रव्यूह'मुळे डेटापर्यंत घुसखोरी करणे हॅकर्सना अशक्य
SCROLL FOR NEXT