Latest

कोल्हापूर : मटकाकिंग विजय पाटील याच्यासह 12 बुकी वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरसह जिल्ह्यातील मटका आणि तीन पानी जुगार अड्ड्यांचे रॅकेट मोडीत काढण्यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील कुख्यात मटकाकिंग गॅगचा प्रमुख विजय लहू पाटील (रा. देवकर पाणंद) याच्यासह 12 बुकी साथीदारांना वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. गुरुवारी एकाच दिवशी कारवाई झालेल्या या बुकींना ताब्यात घेऊन जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले.

हद्दपार झालेल्यांत विजय पाटीलसह राहुल बाळू गायकवाड (रा. यादवनगर, राजारामपुरी), अजित सर्जेराव इंगळे (टिंबर मार्केट), संदीप बाळासाहेब राऊत (संध्यामठ गल्ली, शिवाजीपेठ), प्रकाश नागनाथ गाडीवडर (क्रशर चौक, सानेगुरुजी वसाहत), दिलीप जगन्नाथ अधिकारी (संभाजीनगर, मोरे कॉलनी), आनंदा श्रीपती दुकांडे (वेताळमाळ तालमीजवळ, शिवाजी पेठ), चैतन्य विलास बंडगर (क्रशर चौक, झोपडपट्टी), विष्णू पांडुरंग आग्रे (रा. काटेभोगाव, ता. पन्हाळा), निरंजन वसंत ढोबळे (मंगळवार पेठ, कोल्हापूर), कुलदीप बाजीराव लांबोरे (मंगळवार पेठ), नंदकुमार पंडितराव चोडणकर (गंगावेश, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये ही कारवाई करून मोठा झटका दिला आहे. शहरासह इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, वडगाव, शहापूर, शाहूवाडी, कागल, मुरगूड येथील स्वयंघोषित मटकाकिंग आणि बुकी रडारवर असल्याचे पोलिस अधीक्षक पंडित, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्रकुमार कळमकर यांनी सांगितले. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे आणि पथकाने हद्दपारीची कारवाई झालेल्या मटका किंग विजय पाटीलसह 12 साथीदारांना ताब्यात घेवून जिल्ह्याबाहेर सोडण्याची कारवाई केली. हद्दपार झालेले संशयित शहरासह ग्रामीण भागात आढळून आल्यास त्याच्या वास्तव्याची स्थानिक पोलिस यंत्रणांना माहिती द्यावी, असे आवाहनही कळमकर यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT