कोल्हापूर, सुनील कदम : राज्यातील कृषी क्षेत्रात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर बेसुमार पद्धतीने वाढत चाललेला आहे. त्याचा परिणाम म्हणून शेत-शिवारात परंपरागतपणे आढळून येणारी जैवसाखळी जवळजवळ नामशेष झाल्यात जमा आहे. पूर्वी शिवारा-शिवारात आढळून येणारे काही ठरावीक प्राणी, पक्षी आणि कीटकांचे तर दर्शनसुद्धा दुर्मीळ झाले आहे.
पाच पटींनी वाढ!
राज्यातील रासायनिक खतांचा वापर हा दहा वर्षांपूर्वी सरासरी हेक्टरी 30 ते 40 किलोग्रॅमपर्यंत असायचा. मात्र अलीकडच्या एक-दोन वर्षात हाच वापर हेक्टरी 150 किलोच्या घरात गेलेला आहे. अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकर्यांकडून जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर होऊ लागला आहे. नाशिक, पुणे आणि औरंगाबाद विभाग रासायनिक खतांच्या वापराच्या बाबतीत आघाडीवर आहेत. राज्यात वापर होणार्या एकूण रासायनिक खतांपैकी जवळपास 75 टक्के रासायनिक खत या तीन विभागांतच वापरले जात आहे.
वापर 41 लाख टनांवर!
राज्यात गेल्यावर्षी खरीप, रब्बी आणि बागायती पिकांसाठी एकूण 41 लाख 12 हजार 600 मेट्रिक टन एवढे रासायनिक खत वापरण्यात आले आहे. त्यापैकी नाशिक विभाग 10.36 लाख टन, पुणे 9.61 लाख टन आणि औरंगाबाद विभागात 10.87 लाख टन इतका रासायनिक खतांचा वापर आहे. कोकण विभागाने सर्वात कमी म्हणजे केवळ 59 हजार टन रासायनिक खते वापरली. अमरावती विभागाने 5.26 लाख तर नागपूर विभागाने 4.42 लाख टन रासायनिक खतांचा वापर केला.
कीटकनाशकांचा वापर!
राज्यातील कीटकनाशकांचा वापर तर भयावह म्हणता येईल, एवढ्या वेगाने वाढत चालला आहे. राज्यात जसजशी बागायत क्षेत्रात वाढ होईल, तसतशी कीटकनाशकांचा वापरात वाढ होताना दिसत आहे. सन 2020-21 आणि 2021-22 मध्ये राज्यातील कीटकनाशकांचा वार्षिक वापर हा जवळपास 934 मेट्रिक टनाच्या आसपास होता. मात्र सन 2022-23 मध्ये राज्यातील कीटकनाशकांचा वापर तिपटींनी वाढलेला दिसत आहे. गेल्या वर्षी राज्यात तब्बल 2497 मेट्रिक टन एवढ्या कीटकनाशकांचा वापर झालेला आहे. हवामानात बदल होईल त्या त्या वेळी आणि अवकाळी पावसानंतर कीटकनाशकांच्या वापरात वाढ होताना दिसत आहे.
पर्यावरणावर परिणाम!
रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या बेसुमार वापराचा शेत-शिवारातील पर्यावरणावर अतिशय विपरीत परिणाम होताना दिसत आहे. रासायनिक खतांच्या भडिमारामुळे शेतातील पर्यावरणाचे संतुलन साधणारे गांडूळ आणि छोटे-मोठे कृमी कीटक आजकाल जवळपास नामशेष झालेले दिसतात. त्याचप्रमाणे या छोट्या-मोठ्या कृमी कीटकांवर अवलंबून असणारे अन्य पक्षी, फुलपाखरे, किडे, भुंगे, मधमाश्या हे जीवही आजकाल शिवारांमध्ये आढळून येताना दिसत नाहीत. एवढेच नव्हे तर पूर्वी शेतात मोठ्या प्रमाणात आढळून येणारे विंचू आणि सरडे तर जवळपास दुर्मीळच झाले आहेत. परिणामी शेतशिवारातील जैवसाखळी जवळपास मोडीत निघाल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. भविष्यात हा प्रकार असाच वाढत चालल्यास एकूणच शेती आणि पर्यावरणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा कानोसा लागल्यानेच केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यावरणतज्ज्ञांनी शेतकर्यांना पर्यावरणपूरक किंवा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला आहे.
आता या सगळ्यातून बाहेर पडण्याची गरज!
देशाची अन्नधान्याची वाढती गरज भागविण्यासाठी हरितक्रांती अवतरली. साहजिकच त्याच्या पाठोपाठ अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर वाढत गेला. पण या वापराला कोणताही शास्त्रीय पाया राहिलेला नाही. माती परीक्षण न करता, जमिनीला कोणत्या घटकांची आवश्यकता आहे ते विचारात न घेता रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर वाढत गेला. परिणामी जमिनींचा पोत बिघडला आणि पर्यावरणही धोक्यात आले आहे. आता हे कुठेतरी थांबायला हवे. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
-डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ पर्यावण तज्ज्ञ, कोल्हापूर
सेंद्रिय शेतीकडे वाढता कल
रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे होणारी शेती आणि पर्यावरणाची हानी हळूहळू शेतकर्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत राज्यातील शेतकर्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढताना दिसत आहे. सन 2019-20 मध्ये दोन लाख 93 हजार हेक्टर, 2020-21 मध्ये तीन लाख 71 हजार हेक्टर आणि 2021-22 साली तब्बल 11 लाख 33 हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेतीची लागवड झाली आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढताना दिसत आहे. राज्यातील सेंद्रिय शेतमालाचे उत्पादनही वार्षिक 7 ते 9 लाख मेट्रिक टनावर जाऊन पोहोचले आहे. मात्र सेंद्रिय शेती उत्पादन अजूनही वाढण्याची गरज आहे.