Latest

उन्हाळ्यात शीतपेयांचे अधिक सेवन हानिकारक

Arun Patil

नवी दिल्ली : सध्या सर्व देशभर उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. उन्हाळ्यात सतत तहान लागते आणि बरेच लोक शीतपेय पिऊन तहान भागवतात. मात्र, शीतपेयांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

उन्हाळ्यात असे हवेहवेस वाटणारे पदार्थ, शीतपेय याचा मोह टाळणं गरजेचं आहे. त्याशिवाय रखरखत्या उन्हाळ्यात आपल्या आरोग्याकडे विषेश लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात शीतपेयांचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. शीतपेयांच्या अतिसेवनाने यकृत, हृदयासारख्या अवयवांभोवती अतिरिक्त चरबी जमा होते. त्यामुळे कोलेस्टेरॉलच्या पातळीत वाढ होऊन, मधुमेहाचा धोका वाढू शकतो. शिवाय, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक याचाही धोका निर्माण होऊ शकतो. शीतपेयांमध्ये साखरेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. यात अधिक कॅलरीज असून, शरीराला यातून कोणत्याही प्रकारच्या पौष्टिक गोष्टी मिळत नाहीत.

शीतपेय शरीरात गेल्यानंतर चयापचय होऊन त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं. ही चरबी केवळ त्वचेखाली नाही, तर यकृत आणि हृदयाजवळदेखील जमा होते. ही चरबी 'व्हिसरल फॅट' म्हणून ओळखली जाते, जी शरीरास धोकादायक ठरते. या शीतपेयांचं अतिसेवन किंवा नियमित सेवन केल्यास ते वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतं. अतिरिक्त व्हिसरल फॅट अर्थात या चरबीमुळे शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो. यामुळे मधुमेहाचा धोका निर्माण होतो. कोलेस्टेरॉलवरदेखील विपरीत परिणाम होतो आणि याचा यकृतावरही परिणाम होऊ शकतो.

शरीरासाठी वाईट असलेल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढली, तर चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. तसंच ट्रायग्लिसराईडस् हा रक्तातील चरबीचा दुसरा प्रकारदेखील वाढतो. या फॅटस्मुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन हृदयाच्या रक्त प्रवाहात अडथळा आणतात आणि हृदयविकाराचा धोका वाढवतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT