हैदराबाद : तेलंगणामध्ये पुरातत्त्व संशोधकांनी उत्खननात दोन प्राचीन मंदिरांचा शोध लावला आहे. ही मंदिरे 1300 वर्षांपूर्वीची असून येथे सापडलेला एका शिलालेख 1200 वर्षांपूर्वीचा आहे. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात कृष्णा नदी किनारी वसलेल्या मुदिमानिक्यम गावात हे उत्खनन झाले. त्यावेळी संशोधकांना दगड तुटण्याचा आवाज आला. जेव्हा त्यांनी माती बाजूला करून पाहिलं तेव्हा तिथे दुर्मीळ शिलालेखासह बादामी चालुक्य काळातील दोन मंदिरे आढळली.
मुदिमानिक्यम गावातील पब्लिक रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्रीच्या डॉ. एम.ए. श्रीनिवास आणि एस. अशोक कुमार यांची टीम हे खोदकाम करीत होती. शास्त्रज्ञांनुसार, हा शिलालेख 8 व्या किंवा 9 व्या शतकाच्या पूर्वीचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तेव्हा बदामी चालुक्य वंशाचे शासन होते. या मंदिरांची अनोखी वास्तुशैली त्यांचं वेगळेपण दर्शवते. या शिलालेखावर 'गंडालोरुंरु' हा शब्द लिहिण्यात आला आहे. हा त्या काळातील शब्द आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संचालक डॉ. मुनिरत्नम रेड्डी यांनी सांगितले की कन्नडमध्ये 'गंडा' हे अक्षर 'नायक' दर्शवते. याचा अर्थ कदाचित वीर असा होत असेल. बदामी चालुक्य मंदिरांमध्ये कदंब नागर शैलीचा प्रयोग करण्यात आला आहे. हे तेलंगणातील एक दुर्मीळ वास्तुशिल्प आहे. येथे पंचकुटा नावाने पाच मंदिरांचा समूह आहे. या मंदिरांच्या शिलालेखांवरही गंडालोरुंरु शब्द लिहिलेला आहे. सापडलेल्या दोन्ही मंदिरांची वैशिष्ट्येही खास आहेत. एका मंदिरात शिवलिंगाचा काही भाग शिल्लक आहे, तर दुसर्या मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती आहे, जी बहुतांशी सुरक्षित आहे. ही मंदिरे त्याकाळी किती भव्य आणि दिव्य होती हे लक्षात येते.