मुंबई : ताजेश काळे : अयोध्येत २२ जानेवारी रोजी आयोजित प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण व प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या अनुषंगाने 'भावी पिढीला आदर्श संस्कार आणि नीतिमूल्यांचे धडे देण्यासाठी श्रीमद रामायण, महाभारत विषयावर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला मुंबईसह राज्यातील तब्बल दीड लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून रामनामाचा जागर केला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या नावाने जैन, शीख बांधवांसह इतर धर्मातील लोकही सेवेसाठी स्वयंस्फूर्तीन पुढे आले आहेत.
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमद रामायण व महाभारत या विषयावर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश महामंत्री मोहन सालेकर यांनी दै. पुढारीला दिली.
ते म्हणाले की, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण व प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे देशभरात सध्या प्रचंड उत्साह, भक्ती आणि चैतन्याचे वातावरण आहे. त्याच अनुषंगाने विविध उपक्रम घेतले जात आहेत. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी १० राज्यांमधील १४०० शाळांमधून एकाचवेळी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना महान संत आणि क्रांतिकारकांच्या कथा विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आल्या होत्या. त्यावर अभ्यासक्रम ठरवून १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत सहभागी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत प्रत्येक शाळा व इयत्तेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला सुवर्णपदक प्रदान केले जातील. ५० टक्क्यपिक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांना आकर्षक प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. परीक्षेचे नियोजन करण्यासाठी ७००० शिक्षकांसह १४५० साधक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. संस्कारक्षम पिढी घडविण्याच्या उद्देशाने गेल्या २० वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षी अयोध्येत श्रीराम मंदिर साकारल्यामुळे विद्याथ्यांचा मोठा प्रतिसाद लाभल्याचे सालेकर यांनी सांगितले.
अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील शीख बांधवांमध्येही प्रचंड उत्साह संचारला आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ३ यावेळेत नवी मुंबईतील रामभक्तांना छबील सेवा दिली जाणार असल्याची माहिती उद्योजक कुलदीप सिंग यांनी दिली. या सेवेत रामभक्तांना गुलाबपाणी मिश्रित सुगंधित दूध आणि नाश्ता वाटप केला जाणार आहे. बाबा गुरुनानक, गुरू गोविंदसिंह आणि गुरू तेगबहादूरसिंह यांच्या जयंतीला छबील सेवा दिली जाते. राज्यात इतर ठिकाणीही ही सेवा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जैन समाजाच्या वतीने राज्यातील १०६५ गोशाळांच्या व्यवस्थापनासाठी १ कोटी ८ लाखांचा निधी दान केला जाणार असल्याची माहिती समस्त महाजन संस्थेचे प्रबंध संचालक गिरीश शहा यांनी दिली. याशिवाय जल, वन, भूमी, पशू संरक्षण करण्याचा संदेश घरोघरी पोहोचविण्यासाठी गायीच्या शेणाने बनविलेल्या ४ पणत्यांचे वाटप केले जात असून सोहळ्याच्या दिवसापर्यंत ५० हजार पणत्या वाटण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.