वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : लागोपाठ तीन दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने वेल्हे तसेच हवेली तालुक्यातील भात पिकांचे मोठे नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या सणात शेतकर्यांना अवकाळीचा फटका बसला. सुट्या असतानाही प्रशासनाने नुकसानीची पाहणी सुरू केली आहे. पानशेत, सिंहगड, राजगड, तोरणा, मोसे, मुठा खोर्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पानशेतजवळील आंबी ( ता.हवेली) येथील जवळपास 80 टक्के भात पीक वाया गेले. असेच चित्र सभोवतालच्या गावांत आहे. हवेली तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांच्या देखरेखीखाली कृषी पर्यवेक्षक वैभवराज पवार यांच्या पथकाने सिंहगड, आंबी भागातील नुकसानाची पाहणी केली.
साळे म्हणाले, कापणी केलेली भात पिके खाचरात असतानाच 9 ते 11 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करून शासन निर्णयानुसार शेतकर्यांना भरपाई देण्यात येणार आहे. आंबी येथील कांता मारुती निवंगुणे, गुलाबराव गणपत निवंगुणे, शंकरराव निवंगुणे, राजु पासलकर आदी शेतकर्यांचे भात पीक वाया गेले. अशीच स्थिती मणेरवाडी,सोनापूर, खानापूर, मालखेड, खामगाव मावळ, घेरा सिंहगड परिसरात आहे. आंबीचे सरपंच पोपटराव निवंगुणे म्हणाले, जवळपास सर्वच पीक वाया गेल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. खानापूरचे रवींद्र जावळकर म्हणाले, अवकाळी पावसाने पिके भुईसपाट झाली. भिजलेल्या भाताला कोंब फुटले आहेत. दाणे काळे पडले आहेत.
पानशेत, राजगड खोर्यासह वेल्हे तालुक्यात अवकाळी पावसामुळे भाताचे नुकसान झाले. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी सुरू केली आहे.
– दिनेश पारगे, तहसीलदार, वेल्हे