कुरूंदवाड; जमीर पठाण : पतीचे निधन झाले. हसते-खेळते घर क्षणार्धात दु:खसागरात लोटले. नातेवाईक, आप्तेष्टांसोबतच ग्रामस्थही कुटुंबाच्या सांत्वनासाठी आले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या रितिरिवाजाप्रमाणे पतीच्या पश्चात पत्नीला विधवेचे जीणे जगावे लागणार होते; पण हेरवाड ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतलेल्या ऐतिहासिक विधवा प्रथा बंद करण्याच्या निर्णयाने 'ती'चे कुंकू, बांगड्या आणि मंगळसूत्र हे सौभाग्य लेणे शाबूत राहिले.
हेरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीत नुकताच विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक स्तरांतून कौतुक होत असतानाच याची अंमलबजावणी प्रत्यक्ष करण्यात आली.
हेरवाड येथील चर्मकार समाजातील विष्णू गायकवाड (वय 60) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. यांच्या पत्नी तुळसाबाई यांनी कुंकू, मंगळसूत्र, जोडवी, काकणे असे अलंकार हे लेणे कायम ठेवून विधवा प्रथेला फाटा देत ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली. त्यामुळे आता हेरवाड गावचा आदर्श राज्यातच नव्हे, तर देशभरात पोहोचण्यास मदत होणार आहे.
हेरवाड ग्रा.पं.ने घेतलेला निर्णय अंमलात आणणे ही एवढी सोपी गोष्ट नव्हती. अशातच विष्णू गायकवाड यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यानंतर सरपंच सूरगोंडा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व चर्मकार समाजातील पदाधिकार्यांनी विधवा प्रथाबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी गायकवाड यांच्या घरी जाऊन विधवा प्रथाबंदीबाबत प्रबोधन केले. महिलांनाही सर्वांबरोबर सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सांगत, त्यांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, असा प्रकार अशोभनीय आहे. त्यामुळे ही प्रथा बंद करून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
हेरवाड ग्रा.पं. व ग्रामस्थांकडून विधवा प्रथेला बंदी करून क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पाठबळ देण्यासाठी माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे मी ग्रामपंचायतीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी स्त्री अलंकार व कुंकू कायम ठेवणार आहे. इतर महिलांनीही हेरवाड ग्रा.पं.च्या या निर्णयाची अंमलबजावणी करावी.
– तुळसाबाई गायकवाड