Latest

राज्यातील 128 महाविद्यालयांत कौशल्य विकास केंद्र उभारणी

दिनेश चोरगे

कोल्हापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात रोजगारनिर्मितीसाठी युवकांमध्ये कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या वतीने पहिल्या टप्प्यात राज्यातील सुमारे 128 महाविद्यालयांत कौशल्य विकास केंद्राची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे आता पदवीधर विद्यार्थी अभ्यासक्रमाशी सुसंगत कोणते ना कोणते कौशल्य घेऊनच महाविद्यालयातून बाहेर पडणार आहे.

पारंपरिक अभ्यासक्रमातून विद्यार्य्थांना केवळ पदवी शिक्षण मिळत होते. पदवीनंतर नोकरी शोधताना त्याला आवश्यक कौशल्याचे ज्ञान नसल्याने रोजगाराच्या संधीपासून वंचित राहावे लागत होते. त्यापार्श्वभूमीवर युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या द़ृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील 128 महाविद्यालयांची निवड महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकडून करण्यात आली आहे. नॅशनल स्कील कॉलिफिकेशन फ—ेमवर्कशी सुसंगत नॅशनल स्कील डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून तयार केलेल्या अभ्यासक्रमांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील यशवंत आयुर्वेदिक कॉलेज (कोडोली, ता. पन्हाळा), तुकाराम कृष्णाजी कोळेकर आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज (नेसरी, ता. गडहिंग्लज), डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (जयसिंगपूर, ता. शिरोळ) या तीन निवड केलेल्या महाविद्यालयांची नावे सोसायटीकडून कळविण्यात आली आहेत.
संबंधित महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. महाविद्यालयांना त्यांनी निवड केलेल्या कोर्सचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महाविद्यालयातून बांधकाम क्षेत्र- सर्व्हेअर, आरोग्य क्षेत्र – योगा, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट व अ‍ॅपरल सुईंग मशिन ऑपरेटर कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. योजनेतून महाविद्यालय व अन्य शिक्षण घेणार्‍या युवक-युवतींना प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.

राज्यातील 128 महाविद्यालयांत पहिल्या टप्प्यात नव्याने स्थापन होत असलेल्या कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याअनुषंगाने कौशल्य उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने तयारी सुरू आहे.

जिल्ह्यातील तीन महाविद्यालयांत सुरुवातीला कौशल्य विकास केंद्राची उभारणी केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक महाविद्यालयात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या उपक्रमामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या व शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेता येईल. याचा रोजगारनिर्मितीसाठी निश्चित फायदा होईल.
– संजय माळी,
सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, कोल्हापूर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT