Latest

चिंचवड एक्सप्रेसमध्ये घ्या भोजनाचा आस्वाद; रेल्वेने उभारले स्थानकात स्क्रॅपमधून हॉटेल

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : टाकावूमधून टिकाऊ असा एक अनोखा आणि आगळा वेगळा उपक्रम राबवत रेल्वे विभागाने भंगारात स्क्रॅप म्हणून टाकलेल्या डब्ब्यांतून हॉटेल उभारले आहे. हॉटेलमध्ये बसून, रेल्वेच्या डब्यातला जेवणाचा आस्वाद घेण्याचा एक वेगळाच अनुभव आता पिंपरी-चिंचवडकरांना चिंचवड रेल्वे स्थानकात घेता येणार आहे. रेल्वेच्या डब्यांची मुदत संपल्यानंतर रेल्वेच्या डब्यांचा वापर अशा पध्दतीनेदेखील करता येतो. हे रेल्वे विभागाने दाखवून दिले आहे. पहिल्या टप्प्यात चिंचवड स्थानक व यानंतर आकुर्डी, मिरज आणि बारामती येथील स्थानकांवर प्रवाशांसाठी अशी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हॉटेलमध्ये स्वच्छतेला प्राधान्य
रेल्वे विगाने उभारलेल्या हॉटेलमध्ये प्रत्येक कामगार व आचार्‍याची वैद्यकीय आरोग्य तपासणी केली आहे. स्वच्छतेला प्राधान्य देत हॉटेलमधील सर्व अन्न स्वच्छ व सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

कमी दरात जेवण
हॉटेलमध्ये चहा व नाष्ट्यासह व्हेज, नॉनव्हेज आदी भोजनाचाही आस्वाद अतिशय कमी दरात घेता येणार आहे. परिसरात रुग्णालय, महाविद्यालय तसेच उच्चभ्रू लोकांच्या इमारती असल्यामुळे सर्व स्तरातील खवय्यांना आस्वाद घेता येईल, असे दर आहेत.

काही दिवसांतच चोवीस तास सेवा
काही दिवसांतच या हॉटेलमधून नागरिकांना चोवीस तास सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे रात्री प्रवास करणारे तसेच रेल्वे विभाग वा औद्योगिक क्षेत्रातील रात्रपाळी करणार्‍या कर्मचार्‍यांनाही याचा आस्वाद घेता येणार असून, रात्रीच्या जेवणासह सकाळचा नाष्टा करूनच कर्मचारी बाहेर पडेल याची सोय केली आहे.

एसीची सोय
रेल्वेचे पत्रे उन्हामुळे तापल्याने गरम होतात. त्यामुळे खवय्यांची गैरसोय होऊ शकते. म्हणून रेल्वेने हॉटेलमध्ये सर्वांसाठी एसीची सोय केली आहे.

रेल्वेने उपयोगात आणलेल्या आणि स्क्रॅप झालेल्या डब्यांचा वापर करून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे प्रवाशी एक चांगली आठवण मनात घेऊन स्थानकाच्या बाहेर पडणार आहेत. रेल्वे विभाग चिंचवडनंतर आकुर्डी, बारामती व मिरज स्थानकात हा उपक्रम राबविणार आहे.
                                 -मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी रेल्वे, पुणे विभाग.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT