पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडच्या जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाज जोडीने एक महान विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान या गोलंदाज जोडीच्या नावावर 1002 कसोटी बळींची नोंद झाली असून अशी कामगिरी करणारी ही जगातील पहिली गोलंदाज जोडी ठरली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रा आणि दिवंगत महान लेग-स्पिनर शेन वॉर्न या जोडीच्या 1001 विकेट्सचा विक्रम मोडीत काढला आहे.
ब्रॉड आणि अँडरसन या इंग्लिश वेगवान जोडीच्या भेदक मा-या पुढे भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पहिल्या 5 गोलंदाजांच्या यादीत या दोघा वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. इतर तीन गोलंदाज फिरकीपटू आहेत. इंग्लंड सध्या न्यूझीलंड दौ-यावर असून तेथे उभय देशांदरम्यान कसोटी मालिका सुरू आहे. पहिली कसोटी बे ओव्हल मैदानावर डे-नाईट स्वरुपात खेळवली जात आहे. या सामन्याच्या तिस-या दिवशी अँडरसन आणि ब्रॉड जोडीने हा विक्रम नोंदवला.
स्टुअर्ट ब्रॉडने आतापर्यंत 160 कसोटी सामन्यांमध्ये 571 बळी घेतले आहेत, तर जेम्स अँडरसनने आतापर्यंत 178 कसोटी सामन्यांच्या 330 डावांमध्ये 678 बळी घेतले आहेत.
इंग्लंडने पहिला डाव 9 गडी बाद 325 धावांवर घोषित केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल यजमान न्यूझीलंडचा संघ 306 धावांवर आटोपला. अशाप्रकारे किवी संघ 19 धावांनी मागे पडला. त्यानंतर इंग्लंडने दुस-या डावात 374 धावा करून किवींसमोर विजयासाठी 395 धावांचे आव्हान दिले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 28 धावांत पाच विकेट गमावल्या आहेत. ब्रॉडने चार तर ओली रॉबिन्सनने एक विकेट घेतली आहे.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ब्रॉडने नील वॅगनरची विकेट घेत इतिहास रचला. याचबरोबर ब्रॉड-अँडरसनच्या जोडीने 1000 कसोटी विकेट्सचा टप्पा गाठला. त्यानंतर अँडरसनने टॉम ब्लंडेलला बाद करत वॉर्न-मॅकग्रा या जोडीच्या 1001 बळींची बरोबरी केली. तर न्यूझीलंडच्या दुस-या डावात ब्रॉडने डेव्हॉन कॉन्वेचा त्रिफळा उडवून विकेट्सची संख्या 1002 करून विश्वविक्रमाची नोंद केली. यानंतर आणखीन तीन विकेट्सची भर पडल्याने अँडरसन-ब्रॉड जोडीच्या विकेट्सची संख्या 1005 पर्यंत पोहचली आहे.
जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड): 1005* विकेट्स (133* सामने)
शेन वॉर्न-ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया): 1001 विकेट (104 सामने)
मुथय्या मुरलीधरन-चमिंडा वास : 895 विकेट (95 सामने)
कर्टली अॅम्ब्रोस-कोर्टनी वॉल्श : 762 विकेट (95 सामने)
मिचेल स्टार्क-नॅथन लियॉन : 580 विकेट (73 सामने)
वसीम अक्रम-वकार युनूस (पाकिस्तान) : 559 विकेट (61)