Latest

Ben Stokes Retirement : इंग्लंडचा स्टार फलंदाज बेन स्टोक्स वनडेमधून निवृत्त!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने ट्विटरवरून आपल्या निर्णयाची सोमवारी घोषणा केली.

ट्विटमध्ये स्टोक्स म्हणाला की, 'मी मंगळवारी डरहममध्ये इंग्लंडसाठी माझा शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळणार आहे. मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे कमालीचे कठीण झाले आहे. इंग्लंड संघातील माझ्या सहकाऱ्यांसोबत खेळाचा प्रत्येक मिनिट मला खूप आवडला. या काळात आम्ही एक अप्रतिम प्रवास केला,' अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.


इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एक धक्कादायक निर्णय घेत एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्टोक्स मंगळवारी (19 जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. 31 वर्षीय स्टोक्सने 104 एकदिवसीय सामने खेळले असून त्याच्या वनडे कारकिर्दीचा शेवट त्याच्या घरच्या मैदानावर होणार आहे.

बेन स्टोक्सच्या एकदिवसीय कारकिर्दीतील संस्मरणीय क्षण म्हणजे लॉर्ड्स येथे झालेल्या 2019 च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना, जिथे त्याने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 84 धावा करून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या विश्वचषक विजेतेपदाला गवसणी घातली. बेन स्टोक्स त्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

स्टोक्सची आतापर्यंतची वनडे कारकीर्द

31 वर्षीय स्टोक्सने आतापर्यंत 104 एकदिवसीय सामन्यांच्या 89 डावांमध्ये 2919 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 39.45 आणि स्ट्राइक रेट 95.27 आहे. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 102 आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 3 शतके आणि 21 अर्धशतके झळकावली आहेत. तर गोलंदाजीमध्ये त्याने 87 डावात 74 बळी घेतले. त्याचा इकॉनॉमी रेट 6.03 आहे. वनडेमध्ये चेंडूसह त्याची सर्वोत्तम 61 धावांत 5 विकेट अशी आहे.

SCROLL FOR NEXT