लंडन; पुढारी ऑनलाईन : england cricketer moeen ali : इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या वृत्ताला आयसीसीनेही दुजोरा दिला आहे. ब्रिटिश मीडिया रिपोर्टनुसार, मोईनने कसोटी कर्णधार जो रूट आणि मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूडला त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे.
मोईनने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 64 कसोटींमध्ये 28.29 च्या सरासरीने 2914 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 5 शतके आणि 14 अर्धशतके आहेत. तसेच मोईनने 36.66 च्या सरासरीने 195 विकेट्स देखील पटकावल्या आहेत.
112 वनडेमध्ये मोईन अलीने 25.02 च्या सरासरीने 1877 धावा केल्या आहेत. त्याने 50.85 च्या सरासरीने 84 विकेट्स देखील घेतल्या आहेत. तर 38 टी -20 मध्ये मोईनने 437 धावा केल्या आहेत आणि 21 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मोईन अलीने दोन वर्षांनंतर इंग्लंड संघात पुनरागमन केले. होते. त्यापूर्वी तो शेवटची कसोटी 2019 (अॅशेस मालिका)मध्ये खेळला होता.
मोईन अली म्हणाला, मला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना आनंद होत आहे. कसोटी क्रिकेट सर्वोत्तम आहे. मी 34 वर्षांचा आहे आणि पुढे मला फक्त क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे.
मोईन अली सध्या यूएईमध्ये आयपीएलचे सामने खेळत आहे. तो चेन्नई सुपर किंग्जच्या संघात आहे. दरम्यान, अगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडच्या संघात मोईनचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बॅनरखाली पुढील महिन्यात 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
मोईन अली कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावा आणि 200 विकेट घेणारा खेळाडू बनू शकला नाही, तो अशी कामगिरी करण्याच्या अगदी जवळ होता. त्याला 3000 धावा पूर्ण करण्यासाठी 84 धावा आणि 200 विकेट पूर्ण करण्यासाठी 5 विकेट्स आवश्यक होत्या. पण हे लक्ष्य गाठण्याआधीच त्याने कसोटी क्रिकेटला बाय-बाय केले आहे.