Latest

ENGvsSA WT20WC : इंग्लंडचा पराभव करून द. आफ्रिकेची फायनलमध्ये धडक

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ENGvsSA WT20WC : : महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 6 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. जिथे त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सलामीवीरांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 4 गडी गमावून 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 158 धावाच करू शकला. पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले होते.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर लॉरा वुलफार्ट आणि ताजमिन ब्रिट्झ यांच्या अर्धशतकांच्या बळावर द. आफ्रिकेने शुक्रवारी 4 बाद 164 धावा केल्या. वुलफार्टने 44 चेंडूत 53 तर ब्रिट्झने 55 चेंडूत 68 धावा केल्या. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली.

इंग्लंडकडून स्टार फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनने चार षटकांत 22 धावा देत तीन बळी घेतले. वुलफार्टने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. 23 वर्षीय खेळाडूने आपल्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला. वुलफार्टला शार्लोट डीनने झेलबाद केल्यावर एक्लेस्टोनने इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. यानंतर तिची सहकारी सलामीवीर ब्रिट्झने आपली आक्रमक वृत्ती दाखवली. तिने लेगस्पिनर सारा ग्लेनला मारलेला षटकार लक्षवेधी होता. तिने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले.

या दोघींशिवाय मारिजन कॅपने 23 धावांची नाबाद खेळी खेळली. कॅथरीन सायव्हर ब्रंटने डावाच्या शेवटच्या षटकात 18 धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या सहा षटकात 66 धावा चोपल्या.

इंग्लंडने धडाकेबाज पद्धतीने लक्ष्याचा पाठलाग केला आणि पाच षटकांत एकही विकेट न गमावता 50+ धावा केल्या. सहाव्या षटकात शबनिम इस्माईलने एकाच षटकात दोन विकेट घेतल्याने सामन्याला वळण मिळाले. यानंतर इंग्लंडचा संघ नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिला.

अयाबोंगा खाका हिने 18व्या षटकात सामना पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने वळवला. या षटकात तिने तीन बळी घेतले. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर खाकाने एमी जोन्सला बोशकरवी झेलबाद केले. तिला दोन धावा करता आल्या. यानंतर पाचव्या चेंडूवर एक्लेस्टोनलाही बोशने झेलबाद केले. तिला एक धाव काढता आली. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर खाकाने कॅथरीन ब्रंटला एलबीडब्ल्यू आऊट केले. तिला खातेही उघडता आले नाही. इंग्लंडला दोन षटकात 25 धावांची गरज होती, पण संघ केवळ 18 धावा करू शकला. 26 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात विजेतेपदाचा सामना होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT