Latest

पुणे: खेड शिवापूर टोलनाका ते शिंदेवाडी दरम्यानच्या सेवा रस्त्यावरील अतिक्रमण काढले

अमृता चौगुले

खेड शिवापूर, पुढारी वृत्तसेवा: नवले पुलावर सध्या अपघातांची मालिका सुरूच असून त्या ठिकाणची अपघातास कारणीभूत ठरत असलेली अतिक्रमणे हटवली आहेत. या पार्श्वभूमीवर अशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोलनाका ते शिंदेवाडी या दरम्यानच्या सेवा रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या विविध हॉटेल व टपऱ्यांवर गुरुवार (दि. १) पासून कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. ही कारवाई पुढील चार दिवस चालणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून खेड शिवापूर (ता. हवेली) टोलनाका ते शिंदेवाडी (ता. भोर) या दरम्यानच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर हॉटेल व टपरीधारकांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले होते. यामुळे सेवा रस्ते अरुंद झाले होते. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यावर काही कारवाई करणार का? हा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून गुरुवारी राजगड पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई करण्यात आली आहे.

याप्रसंगी राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेले अनिल वाघमारे, गुप्तवार्ताचे अक्षय चव्हाण, फौजदार सतीश चव्हाण, पोलिस हवालदार संतोष तोडकर, तुषार खेंगरे, अमोल सूर्यवंशी, सुधीर खडतरे तसेच एनएचएआयचे तांत्रिक उपव्यवस्थापक अंकित यादव, राकेश कोळी, पाटील, रिलायन्स इन्फ्राचे अमित भाटिया, बद्रीप्रसाद शर्मा, अभिजित गायकवाड आदी उपस्थित होते.

दरम्यान आम्हाला पूर्वसूचना न देताच कारवाई सुरू केली आहे. पूर्वी ३७ मीटर अंतरापर्यंतच कारवाई करणार असल्याचे सांगितले होते; मात्र आता ४२ मीटरपर्यंत कारवाई करीत आहेत. हे चुकीचे असल्याचे येथील हॉटेल व्यावसायिक प्रसाद वनपत्रे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

आम्ही या अगोदरही संबंधित व्यावसायिकांना सांगितले होते की, टोलनाक्याजवळील ४२ मीटरपर्यंत असणारी अतिक्रमने काढण्यात येणार आहेत. तर त्यापुढील ३७ मीटर अंतरावर असलेलली अतिक्रमणे काढणार आहे. त्यामुळे आम्ही कोणालाही अंधारात ठेवले नाही, असे एनएचएआय व रिलायन्स इन्फ्राचे अधिकारी यांनी सांगितले.

पुन्हा अतिक्रमण होऊ नये ही जबाबदारी एनएचएआयची

गत वर्षी याच ठिकाणीची अतिक्रमणे काढण्यात आली होती; मात्र कालांतराने ती पुन्हा झाली. असा प्रकार पुन्हा झाल्यास त्याला सर्वस्वी एनएचएआय जबाबदार असेल. आमचे काम फक्त सुरक्षा देणे आहे, असे राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील व सहायक पोलीस निरीक्षक मानोजकुमार नवसरे यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT