Latest

गणेश चाळोबा हत्तीची दहशत आता हुक्केरी-गडहिंग्लजच्या सीमेवर

अनुराधा कोरवी

दड्डी : पुढारी वृत्तसेवा : सीमाभागात गत २२ दिवसापासून धुमाकूळ घालणाऱ्या चाळोबा गणेश हत्तीने आता हुक्केरी, चंदगड व गडहिंग्लज तालुक्याच्या सीमेवरील चिंचणे जवळील सुमारे दोन हजार एकर क्षेत्र असणाऱ्या जंगलाचा आधार घेतला आहे. या जंगलाशेजारी शट्टीहळळी ( ता. हुक्केरी ) व लमाणवाडा ( ता. गडहिंग्लज) या ठिकाणी या हत्तीने मोठी दहशत निर्माण केली असून सलग पाच दिवसापासून येथे मुक्काम ठोकला आहे. हत्तीचा दिवसाभर जंगलात आणि रात्र होताच शिवारात, असा प्रकार सुरू असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान सुरू आहे. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठे भितीचे वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आजरा येथील चाळोबा मंदिर जंगल परिसरातून सदर हत्ती हा शुक्रवारी ( दि. २३ फेब्रुवारी) रोजी या जंगलात आला आहे. यानंतर चार दिवसात त्याने कुदनुर, होसूर मार्गे बेळगाव तालुक्यातील अतिवाड, बेकिनकेरे जवळील महिपाळगड जंगलाचा आधार घेतला होता. या हत्तीने बेळगाव शहराजवळ संचार करून दहशत निर्माण केली होती. महिपाळगड जंगल परिसरात १५ दिवस या हत्तीने मोठे नुकसान करून तो परतीच्या मार्गावर निघाला असताना गत पाच दिवसापासून शट्टीहळळी, लमाणवाडा जवळील चिंचणे जंगलातच या हत्तीने सध्या मुक्काम ठोकला आहे.

गतवर्षीही या ठिकाणी एक दिवस हत्ती येऊन पुन्हा माघारी तो आजरा येथील जंगलात परतला होता, तर दोन वर्षांपूर्वीही या ठिकाणी हत्ती आला होता. यंदा मात्र, आजरा जंगलातून आलेल्या या गणेश चळोबा हत्तीने मात्र, सीमाभागात २२ दिवसापासून मुक्तपणे संचार करून शिवारात हैदोस घातला आहे.

महिपाळगड जंगलातून हत्ती

रविवारी ( दि. १० ) रोजी पहाटे हत्ती पुन्हा परतीच्या मार्गाने आजराच्या दिशेने जात असताना चिंचणे, कामेवाडी जंगलात विसावला आहे. शट्टीहळळी, लमाणवाडा गावातील अनेक शेतकऱ्यांचे सौरऊर्जा संच हत्तीने फोडले आहेत. तर अनेक ठिकाणी पाण्याच्या प्लास्टिक टाक्या फोडल्या आहेत.

शेतकऱ्यांनी मिळून हत्तीला हुसकावले

गुरुवारी (दि. १४ ) रोजी मध्यरात्री हत्तीने शट्टीहळळी शिवारात आगमन करून मोठ्या प्रमाणात उसाचे नुकसान करत होता. यावेळी सुमारे १५ हून अधिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सदर हत्तीला जंगलात हुसकावून लावले.

शट्टीहळळी येथील भगवंत पाटील, विष्णू पाटील यांच्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तर उत्तम पाटील यांच्या शेती इंजिनवर ठेवण्यात आलेला प्लास्टिक बॅरल फोडून टाकला आहे. तुकाराम कळवीकट्टीकर यांच्या शेतात दुसऱ्यांदा सुमारे एक एकर क्षेत्रात मोठे नुकसान केले आहे. मात्र, सदर हत्तीकडून आता पुढील दिवसात आणखी नुकसान होणार ही भिती लागून आहे .

गत पंधरा दिवसात महिपाळगड जंगलात असताना याच हत्तीने तीन ट्रॅक्टर ट्रॉल्या पलटून नुकसान केले आहे, तर एक लोखंडी बैलगाडी भिरकावली आहे. तसेच एक रोटर नाल्यात ढकलून देऊन नुकसान केले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यानी खबरदारी घेण्याची गरज आहे.

गत पाच दिवसापासून चिंचणे जंगला शेजारील सध्या शट्टीहळळी, लमाणवाडा या परिसरात सदर हत्तीकडून नुकसान सुरू आहे. रात्री हत्ती बाहेर येत असल्याने शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. सदर हत्तीवर हुक्केरी वन विभागाचे वनपथक नियंत्रण ठेवून आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. आवश्यक ती त्यांना नुकसान भरपाई देणार आहोत.
-प्रसन्न बेल्लद, ( आरएफओ, हुक्केरी वनविभाग.)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT