Latest

Rankala Lake : रंकाळा तलावाला ‘क्वीन्स नेकलेस’ रोषणाई

Arun Patil

कोल्हापूर : ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील 'क्वीन्स नेकलेस'च्या धर्तीवर रंकाळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रंकाळा तलाव आणखी उजळून निघणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून 3 कोटी 51 लाख निधी मिळाला असून, त्यातून 120 विद्युतखांब उभारण्यात येणार आहेत. रंकाळ्याचे वैभव जपण्यासाठी सर्व खांब हेरिटेज लूकचे बसविण्यात येणार आहेत.

विस्तीर्ण पसरलेल्या रंकाळ्यावर सर्वाधिक गर्दी असलेल्या ठिकाणी म्हणजे रंकाळा चौपाटी ते टॉवर ते तांबट कमान या मार्गावर विद्युतखांब लावण्यात येणार आहेत. प्रत्येकी 80 फुटांवर एक खांब असेल. एका खांबाची किंमत 80 हजार ते 89 हजार आहे. महापालिकेने त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच ठेकेदार कंपनी नियुक्त झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. सहा महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे. रात्रीच्या वेळी लाईट लागल्यावर रंकाळ्याला नेकलेस घातल्यासारखे दिसणार आहे.

कोल्हापूर शहरातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून भाविक, पर्यटक रंकाळ्याला भेट देतात. त्याबरोबरच स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात रंकाळ्यावर फिरायला जाण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे रंकाळा म्हणजे शहरवासीयांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून तलावात मिसळणार्‍या सांडपाण्यामुळे रंकाळा मरणासन्न अवस्थेतून जात होता. महापालिकेने विविध उपाययोजना करून रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी काही प्रमाणात रोखण्यात यश मिळविले आहे. परिणामी, सद्यस्थितीत रंकाळ्यातील पाणी प्रदूषण थांबले आहे.

राज्य शासनाच्या मूलभूत नागरी सुविधा आणि जिल्हा नियोजनमधून रंकाळ्यासाठी सुमारे 20 कोटींवर निधी मिळाला आहे. यातून रंकाळा संवर्धनाबरोबरच सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. त्याबरोबरच आता रंकाळ्याला 'क्वीन्स नेकलेस'च्या धर्तीवर विद्युत रोषणाईसाठीही निधी मिळाला आहे. त्यामुळे रंकाळ्याचा लूक आणखी बदलणार आहे. स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांसाठीही त्याचे आकर्षण असणार आहे. परिणामी, कोल्हापूरच्या पर्यटनातही वाढ होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT