Latest

राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमुळे यंत्रणेवर ताण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 253 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका 28 आणि 30 एप्रिल रोजी पूर्ण करण्याचे नियोजन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून झाले. यामध्ये पुणे जिल्ह्यात तर एकाच दिवशी 9 बाजार समित्या आणि दोन दिवसांनी आणखी एक, अशा 10 समित्यांचा निवडणूक कार्यक्रम झाल्याने सहकार विभागाच्या कर्मचार्‍यांवर ताण आला. दिवसाआड निवडणूक कार्यक्रम न झाल्याने अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने एप्रिलपूर्वी बाजार समित्यांची निवडणूक पूर्ण करण्याचे नियोजन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने केले. प्रत्यक्षात स्थानिक स्तरावर सहकार विभागात मुळातच कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. शिवाय पुणे जिल्ह्यातील 9 बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी शुक्रवारी (दि.28) मतदान झाले. त्यामध्ये जिल्ह्यातील पुणे, तळेगाव दाभाडे (मावळ), मंचर (आंबेगाव), भोर, निरा (पुरंदर), खेड, इंदापूर, दौंड आणि बारामती बाजार समितीचा समावेश आहे.

जिल्ह्यातील 10 बाजार समित्यांच्या प्रत्येकी 18 जागांसाठी 398 उमेदवार रिंगणात होते. तत्पूर्वी मतदारांच्या प्रारूप याद्यांपासून सूचना-हरकती, सुनावण्या, अपिल, निकालाचे आदेश, मतदान, मतमोजणी या प्रक्रियेत तालुका सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक कार्यालये शेतकरी, मतदार, नेते मंडळींच्या उपस्थितीने भरून गेली होती. वेळेत कामाचे बंधन असल्यामुळे सर्वच कर्मचारी-अधिकार्‍यांवर कामाचा ताण आला. दिवसाआड एका बाजार समितीचे मतदान ठेवले असते, तर प्रत्येक तालुक्याचे कर्मचारी इतरत्र उपयोगी आले असते आणि कामे सुकर झाली असती, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

SCROLL FOR NEXT