Latest

‘भोगावती’सह 400 पेक्षा अधिक संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरनंतर

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या जिल्ह्यातील भोगावती साखर कारखान्यासह महालक्ष्मी, वारणा, पंचगंगासह नागरी बँका, पतसंस्था, दूध संस्था अशा सुमारे 400 पेक्षा अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश राज्य शासनाने बुधवारी काढला आहे. यामधून 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्था वगळल्या असून, त्यांच्या निवडणुका मात्र होणार आहेत.

राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विकास संस्थांची निवडणूक घेण्यासाठी शासनाने नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत सर्व संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मार्चनंतर साखर कारखाने, बँका व इतर संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 7 हजार संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया झाली असून, सुमारे 400 पेक्षा अधिक संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती.

30 जूननंतर राज्यातच मोठ्या प्रमाणावर पावसाची सुरुवात होते. त्यामुळे ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे, अशा संस्थांचे निवडणूक कामकाज पूर्णपणे पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते. तसेच खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू होतात. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्या सहकारी संस्थांमधील सभासद शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त राहतात, असे शेतकरी मतदानापासून वंचित राहू शकतात. यामुळे उच्च न्यायालयाचा निवडणूक घेण्यासंदर्भात झालेला आदेश वगळून ज्या टप्प्यावर संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, त्याच टप्प्यापासून निवडणुकीची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT