अकोले (नगर), पुढारी वृत्तसेवा : अकोले बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यात एक नवे राजकीय समीकरण पुढे येत आहे. अकोले बाजार समिती निवडणुकीत अखेरच्या दिवशी सोमवारी १५९ अर्ज भरले गेले. डॉ. किरण लहामटे आणि वैभव पिचड या आजी- माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.
अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूकीत पहिल्यांदाच शेतकऱ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाल्याने शेतकरीसुद्धा या निवडणुकीत आपले नशीब आजमावू शकतात. पण, मतदार हे सहकारी संस्थेचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, नोंदणी झालेले हमाल, मापारी व व्यापारी हेच असल्याने निवडणुक लढवताना सर्वसामान्य शेतकऱ्याला निश्चितच हा विचार करावा लागणार आहे.
अकोले बाजार समितीची नुकतीच निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीतून १८ सदस्य निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत मतदारांची संख्या ही २ हजार ४७० एवढी असणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३ एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम होती. या निवडणुकीसाठी एकूण १५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची छाननी ५ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच २० एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. ३० एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार असून नंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
सहकारी संस्था सोसायटी मतदार संघातील ११ जागासाठी ९३, हमाल मापारी संघातुन १ जागेसाठी ४, ग्रामपंचायत मतदार संघातून ४ जागासाठी ४८, व्यापारी मतदारसंघातून २ साठी १४ असे एकुण १५९ अर्ज दाखल झाले आहेत.
बाजार समिती निवडणूकीत संचालक पदासाठी रवींद्र गोर्डे, अर्जुन गांवडे, गणेश पापळ, महिपाल देशमुख, राजेंद्र देशमुख, रविंद्र मालुजकर, सुदाम नवले, भानुदास तिंकाडे, संदेश वाळूज, शांताराम संगारे, अशोक उगले, विकास बंगाळ, चक्रधर संदगिर, बाळासाहेब सांवत, भानुदास गायकर, मधुकर दराडे, गंगाराम भोर, चंद्रमोहन निरगुडे, रोहिदास भोर, जालिंदर बोडखे, अशोक आवारी, वसंत धुमाळ, विलास शेवाळे, शिवाजी वाल्हेकर, अनिल सांवत, रावसाहेब वाळुज, भाऊसाहेब बाराहाते, राजेंद्र गवांदे, ईश्वर वाकचौरे, बाळासाहेब आवारी, नामदेव आंबरे, दशरथ ठोंगिरे, किरण कानकाटे, गोरख वालझाडे, अंकुश मुतडक या मातब्बर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
सहकार निवडणूक प्राधिकरणाने यंदा उमेदवारांना एक लाख रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. यासाठी स्वतंत्र खाते काढावे लागणार आहे. निवडणुकीनंतर दोन महिन्यांत खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे. जे उमेदवार खर्च सादर करणार नाही, अशांना तीन वर्षे अपात्र ठरविले जाणार आहे.