Latest

उत्तर प्रदेशात मोदी, योगींचा करिष्मा

दिनेश चोरगे

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा दिसून येतो. या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही स्टार प्रचारक असून, त्यांनी भाजपला पुन्हा एकदा लखलखीत यश मिळवून देण्यासाठी सारे राज्य पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे.

उत्तर प्रदेशात पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान संपले असून, पाच टप्पे अजून बाकी आहेत. येथे लोकसभेच्या एकूण ऐंशी जागा असल्यामुळे सर्वच पक्षांनी जोर लावल्याचे दिसून येते. यावेळी भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडी आमनेसामने आहेत. 7 मे रोजी तिसर्‍या टप्प्यात संभळ, हाथरस, आग्रा, फत्तेपूर, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, बदाऊनी, झोनला आणि बरेली या दहा मतदार संघांत सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. एनडीएमध्ये जयंत चौधरी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोक दल, अनुप्रिया पटेल यांचा अपना दल, निषाद आणि सुहेलदेव यांचा भारतीय समाज पक्ष या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपची बाजू भक्कम दिसून येत आहे.

मोदींची गॅरंटी महत्त्वाचा घटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा, विकास कामांचा धडाका, श्रीराम मंदिराचे निर्माण, योगी यांच्या सरकारने गुंडगिरीचा केलेला नायनाट, या भाजपसाठी जमेच्या बाजू आहेत. भाजपने एनडीए आघाडीतील सर्व पक्षांना त्यांच्या क्षमतेनुसार जागांचे वाटप केल्यामुळे प्रचारातही सुसूत्रता आली आहे. वाराणसीतून पंतप्रधान मोदी लागोपाठ दोनदा प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले होते. यावेळीही त्यांचा विजय ही औपचारिकता असल्यासारखे वातावरण दिसत आहे. सामाजिक न्याय, पायाभूत सुविधांच्या कामाला गती आणि जनकल्याणाच्या योजनांसाठी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने निधीची कमतरता कधीच भासू दिलेली नाही. 'मोदींची गॅरंटी' ही घोषणा प्रभावशाली ठरत आहे. त्यामुळे मतदारांच्या मनांत मोदींबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. जातीय समीकरणांचे गणितही एनडीएने पद्धतशीरपणे सोडविले आहे. उच्चवर्णीयांबरोबरच, ओबीसी, अनुसूचित जाती व जमाती आणि अतिमागास अशा सर्व घटकांना उचित प्राधान्य देण्यात आल्यामुळे विरोधी आघाडीने भाजपचा धसका घेतला आहे.

मायावती फॅक्टरमुळे विरोधकांची कोंडी

गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची युती झाली होती. यावेळी मायावती यांनी 'एकला चलो रे' अशी भूमिका घेतली आहे. आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग या राज्यात आहे. मायावती यांचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी करून दाखविल्यानंतर त्यांचा बोलबाला झाला होता. मागासवर्गीय आणि मुस्लिम ही मायावती यांची मतपेढी मानली जाते. ही मते मायावती यांनी स्वतःकडे राखली आहेत. त्यामुळेच यंदा त्या स्वतंत्ररीत्या रिंगणात उतरल्याने त्याचा सर्वात मोठा फटका विरोधकांच्या इंडिया आघाडीला बसणार, हे सर्वश्रुत आहे. मायावती प्रामुख्याने समाजवादी पक्षाच्या मतपेढीला सुरुंग लावणार असून, तिरंगी लढतींचा लाभ भाजपला होणार, हेही जवळपास स्पष्ट झाले आहे. समाजवादी पक्षाने काँग्रेससोबत केलेली युती किती लाभदायी ठरणार, हे आजच्या घडीला सांगता येणे कठीण आहे.

मुळात या राज्यात काँग्रेसची अवस्था उजाड हवेलीसारखी झाली आहे. विसविशीत झालेले पक्ष संघटन, निधीची चणचण आणि प्रदेश पातळीवर तगड्या नेत्याचा अभाव यामुळे समाजवादी पक्षाला काँग्रेसकडून कसलाही फायदा होण्याची शक्यता नाही. तरीदेखील हे दोन्ही पक्ष भाजपविरोधात एकत्र आले आहेत. एनडीएने लावलेला प्रचाराचा धडाका आणि मायवतींमुळे होणारे मतांचे विभाजन यामुळे इंडिया आघाडी गोंधळून गेली आहे. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्याकडे कोणताही ठोस पर्यायी कार्यक्रम नाही. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम या जोडगोळीने राबविला आहे. त्याकडे आम जनतेने अर्थातच दुर्लक्ष केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT