Latest

एकनाथ शिंदे नवे मुख्‍यमंत्री : देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्‍यमंत्री हाेतील, अशी घाेषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली.  आज रात्री साडेसात वाजता केवळ एकनाथ शिंदे यांचा शपथविधी हाेईल. लवकरच मंत्रिमंडळ विस्‍तार करु. या विस्‍तारामध्‍ये एकनाथ शिंदे यांच्‍यासोबत असलेले आमदार, अपक्ष आणि भाजपचे लोक या मंत्रीमंडळात असतील. माझा मंत्रीमंडळात सहभाग असणार नाही. मी स्‍वत: बाहेर असने; पण सरकार व्‍यवस्‍थित चालविण्‍याची जबाबदारी माझ्‍यावरही असेल, माझे पूर्ण पाठबळ या सरकारला असेल,  असेही फडणवीस यांनी स्‍पष्‍ट केले.

आम्‍ही मुख्‍यमंत्रीपदासाठी लढत नाही :  फडणवीस

भाजप शिवसेना युतीचे सरकार बनेल, अशी घाेषणा २०१९ च्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान माेदींनी केली होती. मात्र हिंदुत्वाचा विरोध केला अशा काँग्रेस राष्ट्रवादीशी शिवसेनेच्‍या नेतृत्त्‍वाने युती केली आणि भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवले. त्यावेळी जनमताचा अवमान केला. आम्‍ही मुख्‍यमंत्रीपदासाठी लढत नाही. ही तत्त्‍वाची लढाई आहे, असेही फडणवीस यांनी स्‍पष्‍ट केले.

महाविकास आघाडी सरकारने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना विरोध केला. त्यामध्‍ये प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला. यासरकारमधील दोन मंत्री मनी लॉड्रींग प्रकरणात जेलमध्ये गेले. दाऊदची संबंधित मालमत्ता खरेदी केली त्या मंत्र्याला अटक व्हावी लागली. ज्यांच्याशी लढलो त्यांच्याशी कसे बसयाचे, कशी कुचंबणा शिवसेना आमदारांची झाली होती. त्‍यामुळे त्‍यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्‍याचा निर्णय घेतला, असेही ते म्‍हणाले.

हिंदुत्‍वाचा विचार पुढे नेणार : एकनाथ शिंदे

भाजपचे संख्‍याबळ सर्वाधिक असल्‍याने ते मुख्‍यमंत्रीपद स्‍वत:कडे ठेवले असते. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्‍या शिवसैनिकाला मुख्‍यमंत्रीपद देण्‍याचा मनाचा माेठेपणा देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला. मी देवेंद्र फडणवीस त्‍यांचे सर्व सहकारी, भाजपने घेतलेल्‍या निर्णयाबद्‍दल मी पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्‍यक्ष जें पी. नड्‍डा यांचे मन:पूर्वक आभार मानताे. शिवसेना आणि भाजपचे सरकार हिंदुत्‍वाचा विचार पुढे नेईल, असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस हे मंत्रीमंडळात सहभागी हाेणार नाहीत. मात्र ते राज्‍य सरकारला मदत करणार आहेत. आम्‍ही राज्‍याच्‍या विकासासाठी आता अहाेरात्र काम करु, असेही ते म्‍हणाले.  अडीच वर्षांपूर्वी काय घडलं हे आपल्‍या सर्वांना माहिती आहे. ती एक वैचारिक तडजाेड हाेती. आमची भाजपबराेबर नैसर्गिक युती हाेती. त्‍यामुळे आम्‍ही पुन्‍हा भाजपबराेबर युती करण्‍याचा निर्णय घेतला. कारण महाविकास आघाडी सरकारमध्‍ये काेणतीही काम करताना मर्यादा येत हाेत्‍या, असेही ते म्‍हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT