Latest

Maharashtra politics | एकनाथ शिंदे – नारायण राणे यांच्यामध्ये बंद दाराआड खल

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यामुळे या भेटीबाबत विविध तर्क लढविण्यात येत आहेत. (Maharashtra politics)

राणे रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसे असल्यास त्यांना महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मदत लागणार आहे. त्यासंबंधी या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत नारायण राणेंना भाजपने पुन्हा संधी दिलेली नाही. रत्नागिरी – सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी असे त्यांना पक्षातील वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याचे कळते.

या मतदारसंघातून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. किरण यांनीही तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून उभे राहतील. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामंत बंधूंची ताकद आहे. त्यामुळे या भेटीत मुख्यमंत्री शिंदे आणि राणे यांच्यात नेमका कसला खल झाला याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

SCROLL FOR NEXT