Latest

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडी चौकशी

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्री आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा कायम असून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) बेलार्ड पिअर येथील कार्यालयात मंगळवारी सुमारे सात तास कसून चौकशी केली.

राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याशी संदर्भात असलेल्या साखर कारखान्याला केलेला कर्जपुरवठा, कारखान्याचा लिलाव आणि खरेदी, विक्रीसंबंधी मनी लाँडरिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात आली आहे. ईडीच्या या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस युनिटेक ग्रुप आणि राज्य सहकारी बँकेशी संदर्भात मुंबईसह पुणे, नागपूर आणि अहमदनगरमधील नऊ ठिकाणी छापेमारी केली होती. यात राज्य सहकारी बँकेने कर्जप्रकरणात बुडीत काढलेल्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याचा लिलावासंदर्भात कारवाईचा समावेश होता.

हा कारखाना बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाईड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्सला विकला गेल्याचा आरोप आहे. यावेळी प्राजक्त तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.

ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या कारखान्यासह कार्यालयात शोधमोहीम राबविली होती. त्यानुसार प्राजक्त तनपुरे यांना चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. प्राजक्त तनपुरे हे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकार्‍यांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी काही कागदपत्रे ईडीला दिल्याची माहिती मिळते.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचे राष्ट्रवादीचे आमदार असलेले प्राजक्त तनपुरे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे माजी खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत.

SCROLL FOR NEXT