Latest

अर्थकारण : अन्नसुरक्षेसाठीचा काळा समुद्र

Arun Patil

काळा समुद्र हा रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसाठी धोरणात्मकद़ृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा एक प्रमुख व्यापारी मार्ग असून, नैसर्गिक संसाधनांचा स्रोत आहे. तसेच लष्करीद़ृष्ट्याही त्याचे आत्यंतिक महत्त्व आहे. रशिया-युक्रेन युद्धाला गेल्यावर्षी सुरुवात झाल्यानंतर रशियाने काळ्या समुद्रातून अन्नधान्याची निर्यात करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाबरोबर करार केला होता. तथापि, युक्रेनने 'नाटो'चे सदस्यत्व घेतल्यानंतर रशियाने या कराराचा भंग झाल्याची भूमिका घेत अन्नधान्याच्या निर्यातीला बंदी घातली आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या धान्य करारातून एकतर्फी माघार घेत असल्याची घोषणा रशियाने गेल्या महिन्यात केली आणि जगभरात एकच खळबळ उडाली. युक्रेनने 'नाटो'मध्ये प्रवेश केल्यामुळे हा करार वैध ठरत नाही, तसेच विदेशी जहाजांवर निर्बंध लागू होतील आणि त्यांच्या तपासणीचे सर्वाधिकार रशियाकडे राहतील, असेही रशियाने ठणकावून सांगितले. परिणामी, संपूर्ण जगाची अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे. जगभरातील धान्याचा पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे दिसून आल्यानेच भारताने तातडीने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालत, देशांतर्गत बाजारपेठेत महागाई भडकणार नाही, याची काळजी घेतली. संपूर्ण जगात धान्याचे तसेच तेलाचे दर वाढलेले आहेत, ते काळ्या समुद्रातून रशियाने धान्याचा पुरवठा थांबवला असल्याने. म्हणूनच काळ्या समुद्रातील धान्य करार म्हणजे काय, याची माहिती घेणे क्रमप्राप्त ठरते.

संयुक्त राष्ट्राचा धान्य करार ज्याला काळ्या समुद्रातील धान्याचा पुरवठा, असेही संबोधले जाते, तो रशिया-युक्रेन युद्धाला गेल्यावर्षी प्रारंभ झाल्यावर प्रत्यक्षात आला. हा करार रशिया, युक्रेन, तुर्की आणि संयुक्त राष्ट्र संघ यांच्यात झाला होता. जुलै 2022 मध्ये अन्न संकटाला तोंड देण्यासाठी तो प्रत्यक्षात आला. युक्रेनमधील काही बंदरांवरून सुरक्षितपणे धान्याची निर्याती व्हावी म्हणून तो केला गेला. तुर्कीमध्ये यासाठीचे समन्वय केंद्र स्थापित करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघ याच्या अंमलबजावणीसाठी काम पाहत होता. हा करार प्रत्यक्षात आल्यामुळे लाखो टन धान्य तसेच इतर अन्नपदार्थ युक्रेनी बंदरांमधून बाहेर पडू दिले गेले. त्यामुळे जागतिक अन्नसुरक्षा कायम राखता आली. युक्रेन हा जगातील सर्वात मोठा धान्य उत्पादक तसेच निर्यातदार देश आहे. आफ्रिका, आशिया तसेच युरोपमधील अनेक देशांना युक्रेनमधून धान्यपुरवठा होतो. कराराच्या जवळपास एक वर्षात 25 दशलक्ष टनांचे जे प्रारंभिक उद्दिष्ट होते, ते ओलांडून 32 दशलक्ष टनांपेक्षा अधिक धान्य काळ्या समुद्रातील बंदरांवरून निर्यात करण्यात आले. यात मका, गहू, सूर्यफूल उत्पादने, जवस, सोयाबीन तसेच अन्नपदार्थांचा समावेश आहे. ही निर्यात प्रामुख्याने चीन, इजिप्त, भारत, इंडोनेशिया, इराण, मोरोक्को, सौदी अरेबिया येथे करण्यात आली.

एकट्या चीनमध्ये 10 दशलक्ष टनांहून अधिक धान्य आयात करण्यात आले. अन्न आणि कृषी संघटनेनुसार जागतिक अन्न किंमत निर्देशांक 7.3 टक्क्यांनी कमी करण्यास या कराराची मदत झाली. युक्रेन जी धान्य निर्यात करतो, त्यापैकी 70 टक्के निर्यात ही काळ्या समुद्रातून केली जाते. ही निर्यात रोखली गेल्याने जगभरात अन्नधान्याची कमतरता जाणवत असून, त्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. जागतिक अन्न संकटाशी सामना करण्यासाठी हा धान्य करार म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. तथापि, युक्रेनने 'नाटो'त प्रवेश केल्यामुळे कराराचे उल्लंघन झाल्याचा दावा रशियाने केला. त्यामुळे काळ्या समुद्रातील 'केर्च' सामुद्रधुनीतून जाणार्‍या विदेशी जहाजांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. काळा समुद्र तसेच अझोव्ह समुद्राला जोडणारा हा एक जलमार्ग आहे. त्यामुळे धान्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी रशियाच्या या निर्णयाबद्दल खेद व्यक्त केला आहे. जगाचा अन्नधान्य पुरवठा अखंडितपणे व्हावा, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काळ्या समुद्राचे महत्त्व

काळा समुद्र हा रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसाठी धोरणात्मकद़ृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा एक प्रमुख व्यापारी मार्ग असून, नैसर्गिक संसाधनांचा स्रोत आहे. तसेच लष्करीद़ृष्ट्याही त्याचे आत्यंतिक महत्त्व आहे. रशियाचा हा प्रमुख व्यापारी मार्ग असून, युरोप तसेच जगाच्या इतर भागात तेल, वायू तसेच अन्य वस्तूंची निर्यात करण्यासाठी याचा वापर केला जातो. काळा समुद्र हा तेल, वायू यांच्यासह मासे यासारख्या नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. ही संसाधने रशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. याच भागात रशियाचे नौदल असून, अन्य देशांचा काळ्या समुद्रातील प्रवेश रोखण्याचे काम ते करते. त्याचवेळी युक्रेनसाठीही तो प्रमुख व्यापारी मार्ग आहे. गहू, मका तसेच इतर अन्नधान्य निर्यातीसाठी त्याचा वापर केला जातो. काळा समुद्र बोस्पोरस आणि डार्डेनेल सामुद्रधुनीद्वारे भूमध्य समुद्राला जोडला जातो. याद्वारे युक्रेनला भूमध्य समुद्रात प्रवेश मिळतो. हा एक प्रमुख व्यापारी मार्ग आहे.

युक्रेनमधील युद्धामुळे तसेच युरोपीय महासंघ आणि अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापार प्रभावित झाला आहे. युरोपीय महासंघाने रशियन आयातीवर निर्बंध लादले आहेत. काळ्या तसेच अझोव्हच्या समुद्रात 'नाटो' देशांचे नौदल सक्रिय झाले आहे. युक्रेन तसेच जॉर्जियाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी 'नाटो'वर आहे. रशियाला प्रत्युत्तर देण्यासाठी 'नाटो'ने रोमानिया, बल्गेरिया, तुर्की, युक्रेन तसेच जॉर्जिया यांच्याबरोबर संयुक्त सराव आणि गस्त आयोजित केली आहे. काळ्या समुद्राच्या किनार्‍यावर एकूण 65 बंदरे आहेत, जी या प्रदेशाच्या आर्थिक समृद्धीमध्ये योगदान देतात. त्यामुळेच काळा समुद्र हा जगातील सर्वात व्यस्त व्यापारी मार्गांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. याचे नियंत्रण अनेक देशांमध्ये विभागलेले आहे.

रशियाच्या काळ्या समुद्राच्या किनार्‍यावर नोव्होरोसियस्क जे रशियाचे सर्वात मोठे बंदर आहे, तुआप्से, सोची, सेवास्तोपोल, केर्च, तामन यासह 15 बंदरे आहेत. युक्रेनच्या काळ्या समुद्राच्या किनार्‍यावर 18 बंदरे आहेत. ज्यात ओडेसा, क्रोनोमोर्स्क, युझनी, मरुयूपोल, बर्डेन्स्क आणि खेरसन यांचा समावेश आहे. तुर्कीची 9, रोमानियाची 12, बल्गेरियाची 7, तर जॉर्जियाची 4 बंदरे आहेत. रशियाने नौदलाचा वापर करत युक्रेनी बंदरांची नाकेबंदी केली आहे. तसेच 'नाटो' जहाजांचा समुद्रातील प्रवेश रोखण्याचीही धमकी दिली आहे. त्यामुळे रशिया आणि 'नाटो' यांच्यातील व्यापक संघर्षाचा धोका निर्माण झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धाने या समुद्राचे सामरिक महत्त्व अधोरेखित केले असले, तरी रशिया आणि पाश्चिमात्य राष्ट्रे यांच्यातील तणावाचे तो प्रमुख कारण बनला आहे.

अन्न व तेल वाहतूक

जागतिक गव्हाच्या निर्यातीपैकी सुमारे 30 टक्के, तर सूर्यफूल तेलाच्या निर्यातीपैकी 78 टक्के निर्यात ही काळ्या समुद्रातून होते. ही आकडेवारी जागतिक अन्नसुरक्षा धोक्यात का आली आहे, हे स्पष्टपणे सांगते. तसेच रशिया आणि कॅस्पियन समुद्रातून युरोपपर्यंत तेल आणि वायूसाठी समुद्र हा एक प्रमुख मार्ग आहे. युक्रेन आणि रशिया हे गहू, मका आणि सूर्यफूल तेलाचे प्रमुख उत्पादक देश आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभरात त्यांची टंचाई भासत असल्याने, त्यांच्या किमती वाढल्या आहेत. काळ्या समुद्रात अनेक तेल आणि वायू क्षेत्रे आहेत. ती रशिया, युक्रेन आणि प्रदेशातील इतर देश चालवतात. काळ्या समुद्रातील अन्न आणि तेल वाहतुकीचे भविष्य आज तरी अनिश्चित आहे. म्हणूनच काळ्या समुद्रातून अन्न आणि तेलाची वाहतूक करण्याच्या मार्गात दीर्घकालीन बदल होऊ शकतात. या वाहतुकीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नवीन पायाभूत सुविधा उभारल्या जातील.

रशिया आणि कॅस्पियन समुद्रातून युरोपला तेल आणि वायूपुरवठा करण्यासाठी नवीन वाहिन्या उभ्या केल्या जातील. युक्रेनमधून इतर देशांना होणारी अन्नधान्याची निर्यात सुरळीतपणे सुरू राहावी म्हणून नवीन बंदरे उभी केली जाऊ शकतात. या प्रदेशातील देश अधिक सुरक्षित तसेच शाश्वत वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. यामध्ये सागरी सुरक्षेबाबत सहकार्य तसेच नवीन पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक, नवीन व्यापारी मार्गांचा विकास यांचा समावेश असू शकतो. आज काळ्या समुद्रातील अन्न आणि तेल वाहतुकीचे भविष्य अनिश्चित असले, तरी जागतिक व्यापारात हा समुद्र कळीची भूमिका बजावत राहणार, हे मात्र नक्की.

रशियाचे नियंत्रण

रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर काळ्या समुद्रातील व्यापारावर नियंत्रण हा प्रमुख मुद्दा आहे. रशियाने युक्रेनी बंदरांची नाकेबंदी केली आहे. काळ्या समुद्रात रशियाच्या नौदलाचे लक्षणीय अस्तित्व आहे. त्यामुळे समुद्रातील वाहतूक नियंत्रित करण्याची क्षमता रशियाकडे आहे. त्याचवेळी रशियाने पूर्व युक्रेनमधील फुटीरवाद्यांना बळ देत युक्रेनच्या काही बंदरांवर ताबा मिळवला आहे. युक्रेनने डॅन्यूब नदीवरील बंदरांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. तथापि, धान्य तसेच इतर वस्तूंच्या वाहतुकीसाठी ही नदी कार्यक्षम नाही. रशियाने युक्रेनी बंदरांची केलेली नाकेबंदी उठवण्याची आंतरराष्ट्रीय समुदायाने केलेली मागणी रशियाने अर्थातच फेटाळून लावली आहे. आपल्या सुरक्षेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ती आवश्यक आहे, असा युक्तिवाद रशियाने केला आहे. अर्थातच, रशियाने काळ्या समुद्राभोवतालच्या प्रदेशात रशियाचा प्रभाव कायम राहील, यासाठी गेली कित्येक वर्षे विशेष प्रयत्न केले आहेत.

बंदरे तसेच पर्यटनासाठीची क्षेत्रे विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवला आहे. त्यामार्फत रशियाने प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या भागाचे सामरिक महत्त्व लक्षात घेऊन 'नाटो'ही येथे घुसखोरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया, मोल्दोव्हा तसेच युक्रेन यांना सोबत घेऊन 'नाटो' काळ्या समुद्रात प्रवेश करू इच्छितो. रशियाला काळ्या समुद्रावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. म्हणूनच युक्रेनची तीन प्रमुख बंदरे रशियाने आपल्या ताब्यात घेतली आहेत. त्यामार्फत रशियाने नाकेबंदी केली आहे. तूर्तास तरी 'नाटो'ने रशियाशी थेट संघर्ष टाळण्याची इच्छा असल्याचे म्हटले असले, तरी भविष्यात तो होणारच नाही, असे नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT