नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 1950 ते 2015 या 65 वर्षांत देशातील हिंदूंच्या लोकसंख्येत 7.82 टक्क्यांची घट झाली आहे. मुस्लिमांची संख्या मात्र 43.15 टक्क्यांनी वाढली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
'धार्मिक अल्पसंख्याकांचा सहभाग ः एक देशव्यापी अभ्यास' या नावाने जारी करण्यात आलेल्या अहवालात देशाच्या लोकसंख्येत विविध धर्मीयांचा किती वाटा आहे व तो कसा कमी अथवा जास्त होत आहे, यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
अहवालात म्हटले आहे की, 1950 साली हिंदूंची लोकसंख्या 84.68 टक्के होती. ती 2015 मध्ये 78.06 टक्के झाली आहे. याचाच अर्थ त्यात 7.82 टक्क्यांची घट झाली आहे. दुसरीकडे, मुस्लिम धर्मीयांची संख्या मात्र वाढती राहिली आहे. 1950 मध्ये मुस्लिमांची संख्या 9.84 टक्के होती, ती आता 43.15 टक्क्यांनी वाढून 14.09 टक्के झाली आहे. ख्रिस्ती धर्मीयांची लोकसंख्याही 65 वर्षांत चांगलीच वाढली आहे. 1950 मध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या 2.24 टक्के होती, ती 2015 मध्ये 2.36 टक्के झाली आहे. म्हणजेच ख्रिश्चनांची लोकसंख्या या कालावधीत 5.38 टक्क्यांनी वाढली आहे. या अहवालानुसार, जैन धर्मीयांची लोकसंख्या घटली आहे. 1950 मध्ये ती 0.45 टक्के होती ती आता 2015 मध्ये 0.36 टक्के झाली आहे.
आरोप-प्रत्यारोप सुरू
हा अहवाल येताच त्याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भाजप आणि काँग्रेसने यावर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, देशात हिंदूंचा टक्का 7.8 टक्क्यांनी घटला आहे; तर मुस्लिमांचा 43 टक्क्यांनी वाढला आहे. काँग्रेसच्या अनेक दशकांच्या राजवटीचे हे फळ आहे. देश पुन्हा त्यांच्या हाती गेल्यास हिंदूंसाठी देशच राहणार नाही.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य म्हणाले की, लोकसंख्येतील असंतुलन ही चिंतेची बाब आहे. काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाचे हे फळ आहे. यासाठीच देशात समान नागरी कायदा आवश्यक आहे. काँग्रेसने या आरोपांचे खंडन तर केलेच आहे; शिवाय अहवालावरच प्रश्नचिन्ह लावले आहे.
अहवालात नोंदवलेली मते
* समाजातील वैविध्य वाढावे यासाठी उत्तम वातावरणाचा हा परिणाम.
* धोरणात्मक कृती, राजकीय निर्णय आणि सामाजिक प्रक्रिया यामुळे बहुसंख्याकांच्या लोकसंख्येत घट, तर अल्पसंख्याकांच्या लोकसंख्येत वाढ.
* जागतिक ट्रेंडही बहुसंख्याकांची लोकसंख्या कमी होण्याचाच आहे, भारतातही तेच दिसते.
* दक्षिण आशियातील शेजारी देशांत मात्र धार्मिक बहुसंख्याकांची लोकसंख्या वाढताना दिसते.
* बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान आणि अफगाणिस्तानात धार्मिक अल्पसंख्याकांची लोकसंख्या घटली.
* मालदीव वगळता मुस्लिम बहुसंख्य देशांत धार्मिक बहुसंख्याकांची लोकसंख्या वाढली.