Latest

वेगवेगळ्या धान्यांची भाकरी खाणे लाभदायक

Arun Patil

सध्याच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे लोकांना आरोग्याशी संबंधित विविध समस्यांना सामारे जावं लागतं. अशावेळी आरोग्याबाबत जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वप्रथम तुमच्या आहारात बदल करावा लागेल, असे आहारतज्ज्ञ सांगतात. सकस आणि पौष्टिक आहार घेतल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याच्या संबंधित आजार कमी करू शकता. जसे की, तुमच्या रोजच्या आहारातील भाकरी वेगवेगळ्या धाण्यापासून बनवलेली खाल्ली, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. आहारतज्ज्ञांच्या मते, मिश्रित धान्यापासून बनवलेल्या भाकरीचा आहारात समावेश केल्याने आरोग्य चांगले राहते.

ज्वारीची भाकरी

ज्वारीचे पीठ ग्लुटेनमुक्त आहे. जे ग्लुटेन संवेदनशील लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याशिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी आहे. त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण त्याचा आहारात समावेश करू शकतात. या भाकरीचे सेवन रक्तातील साखरेला नियंत्रित ठेवते. एवढेच नाही, तर शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळीदेखील सामान्य ठेवते. ज्यामुळे रक्तदाब सामान्य राहतो आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. जर थायरॉईड किंवा हृदयाची समस्या असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. ज्वारी फायबर आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे, पोषक तत्त्व जे पचन सुधारतात आणि हाडांचे आरोग्यही राखतात.

नाचणीची भाकरी

नाचणी हे उच्च प्रथिनयुक्त अन्न आहे आणि त्यात कॅल्शियमदेखील भरपूर आहे. इतकंच नाही, तर त्यात फायबरसह इतरही अनेक महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे ते एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे विशेषतः हाडांच्या आरोग्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. त्याचवेळी, हे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. नाचणीच्या भाकरीमुळे कॅलरीजचे सेवन मर्यादित राहते, त्यामुळे वजन कमी करण्यास प्रोत्साहन मिळते.

सत्तूची भाकरी

सत्तूपासून बनवलेल्या भाकरीचे सेवन स्नायूंच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. याशिवाय इतर पौष्टिक घटक जसे की फायबर, मॅग्नेशियम, लोह इत्यादी त्यात आढळतात, ज्यामुळे त्याची गुणवत्ता वाढते. ते तुमच्या शरीराचे तापमान राखतात आणि वजन व्यवस्थापनात प्रभावीपणे काम करतात. जर तुम्ही वजन कमी करणारा आहार घेत असाल, तर तुम्ही सत्तूचा समावेश करू शकता.

बाजरीची भाकरी

बाजरीच्या पिठामध्ये लोह, प्रथिने, फॉलिक अ‍ॅसिड आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे शरीरात सामान्य हिमोग्लोबिनची पातळी राखण्यास मदत करते आणि अशक्तपणाच्या बाबतीत खूप प्रभावी ठरते. एवढेच नाही, तर रक्ताभिसरण योग्यप्रकारे होण्यास मदत होते. ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य पूर्णपणे सामान्य राहते. प्रत्येकजण आपल्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करू शकतो. विशेषत:, ज्यांना हृदयाच्या समस्या आणि मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी बाजरीच्या भाकरीचे सेवन करावे, असे तज्ज्ञ सांगतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT