Latest

कॅनडासाठी ई-व्हिसा पुन्हा सुरू

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यात टोकाला पोहोचलेला तणाव आता निवळायला सुरवात झाली आहे. या तणावादरम्यान भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी स्थगित केलेली ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी आजपासून ई-व्हिसा सेवा सुरू झाल्याची माहिती दिली.

तब्बल दोन महिन्यानंतर भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. राजनैतिक वादामुळे भारताने 21 सप्टेंबरला ई-व्हिसा सेवा स्थगित केली होती. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची जूनमध्ये हत्या झालीहोती. या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सहभागी असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केल्यानंतर भारतात याची संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. भारत सरकारने कॅनडाचे आरोप फेटाळून लावताना पंतप्रधान ट्रुडो यांनी हेतुपुरस्सर आरोप केल्याचा दावा करताना या प्रकरणात पुरावे सादर करावे असे आव्हानही कॅनडाला दिले. त्यानंतर कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तालयामधील वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍याला पाच दिवसात देश सोडण्याचे आदेश दिल्यानंर उभय देशांमधील तणाव वाढला होता.

पाठोपाठ कॅनडाने आणि भारताने आपल्या नागरिकांना परस्परांच्या देशात जाताना काळजी घेण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्याने तणावात आणखी भर पडली. यानंतर भारताने कॅनडाचे राजनैतिक अधिकारी अंतर्गत कारभारामध्ये ढवळाढवळ करत असल्याचा ठपका ठेवून उच्चायुक्तालयातील अधिकार्‍यांची संख्या कमी करण्यास कॅनडाला सुनावले होते. अंतिमतः कॅनडाच्या नागरिकांना दिली जाणारी ई व्हिसा सेवा स्थगित करण्याचे हत्यार भारताने उपसले. कॅनडात असलेल्या भारताच्या व्हिसा अर्ज केंद्राची सेवा निलंबित करताना व्हिसा देण्यात कॅनडाकडून भेदभाव होत असल्याचाही ठपका भारताने ठेवला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT