पुढारी ऑनलाईन : मेटा, ट्विटर आणि मायक्रोसॉफ्ट नंतर आता ॲमेझॉनने (Amazon) कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकन तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स क्षेत्रात दिग्गज असलेल्या अॅमेझॉनने वाढत्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर नॉन- प्रॉफिटेबल उपक्रमांची व्याप्ती कमी केली आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पाठवलेल्या एका मेमोनुसार कंपनीने गेल्या आठवड्यात नवी नोकरभरती गोठवली. ॲमेझॉनमध्ये काम करणार्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने लिंक्डइनवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने कंपनीतून काढून टाकण्यात आल्याचे उघड केले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त Business Today ने दिले आहे.
त्याचबरोबर एका माजी कर्मचाऱ्याने केलेल्या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की संपूर्ण रोबोटिक्स टीमच्या हातात नारळ दिला आहेत. LinkedIn च्या डेटानुसार, कंपनीच्या रोबोटिक्स विभागामध्ये किमान ३,७६६ कर्मचारी काम करतात. पण यातील नेमक्या किती कर्मचार्यांना काढून टाकण्यात आले आहे याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की कंपनीने तोट्यात असलेल्या युनिट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचार्यांना इतरत्र नोकरी शोधण्याची सूचना केली आहे. कारण ते ज्या प्रकल्पात काम करत आहेत ते लवकरच बंद होऊ शकतात किंवा निलंबित केले जाऊ शकतात. गेल्या आठवड्यात ॲमेझॉनने (Amazon) कंपनीच्या इंटर्नल मेमोमध्ये म्हटले होते की कमजोर आर्थिक वातावरणामुळे कंपनी नवी नोकरभरती थांबवणार आहे.
दरम्यान, फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटाने जगभरातील ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ही माहिती दिली आहे. मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, मेटा आणि आता ॲमेझॉनने कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राताला मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा :