वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून जरांगे पाटील हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची अचानक तब्येत खालावली आहे.जरांगे पाटील यांना अशक्तपणा आणि उष्णतेचा त्रास जाणवल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली असून दौरा अर्धवट सोडून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे नेहमी उपचार घेत असलेल्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
श्रीक्षेत्र नारायण गड येथे ८ जून रोजी होणाऱ्या सभेच्या मराठा समाजाच्या विराट सभेच्या पूर्वतयारीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाड्या सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात संवाद दौरा सध्या सुरू आहे. या संवाद दौऱ्याच्या निमित्ताने ते आज धाराशिव जिल्ह्यातील वाशी येडशी येरमाळा या परिसरात होते परिसरात संपर्क दौऱ्यावर होते. येथील अनेक ठिकाणी मराठा समाज बांधवांशी त्यांनी संवाद साधला व बैठका घेतल्या.मात्र वाढती उष्णता आणि रोजच होणारी दौऱ्यातील दगदग यामुळे अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना आजचा दौरा अर्ध्यावर सोडावा लागला आणि छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात भरती व्हावे लागले.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून मात्र त्यांच्या रक्ताच्या व इतर चाचण्या होणे बाकी असल्याने नेमका त्यांना काय त्रास होतो हे स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत डॉक्टरांनी आत्तापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसल्यामुळे नेमका त्यांना कोणता त्रास होतो. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.