Latest

पुणे : चंदनाची झाडे तोडू द्या! चोरीच्या भीतीमुळे ‘एनआयबीएम’ची महापालिकेकडे अजब मागणी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चंदनाच्या वृक्षांची चोरी होण्याची भीती आहे आणि त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने तब्बल 60 वृक्ष तोडण्याची परवानगी द्यावी, अशी अजब मागणी कोंढवा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकने (एनआयबीएम) महापालिकेकडे केली आहे. आश्चर्य म्हणजे पालिकेनेही परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

एनआयबीएमच्या आवारातील कार्यालय आणि वसतिगृहात चंदनाचे 60 वृक्ष आहेत. या वृक्षांची चोरी होत असल्याने ते काढण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव नोव्हेंबर महिन्यात महापालिकेच्या हडपसर-कोंढवा क्षेत्रीय कार्यालयाकडे आला होता. त्यावर क्षेत्रीय कार्यालयाने लगेचच तत्परता दाखविली. या चंदनाच्या वृक्षांमुळे जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अटी-शर्तीनुसार स्थानिक जातीचे 929 वृक्ष लावण्याच्या अटीवर पूर्णपणे हे वृक्ष काढण्याची आवश्यकता असल्याचा सकारात्मक अभिप्राय दिला आहे.

एनआयबीएम आणि महापालिका या दोघांनीही आता केवळ चोरी होतेय म्हणून हे वृक्ष काढण्याचा पवित्रा घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुळातच या वृक्षांची चोरी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असताना थेट वृक्ष काढून टाकणे हा अखेरचा पर्याय असू शकतो का असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या प्रस्तावास परवानगी मिळाल्यास असे चंदनाचे वृक्ष काढण्याचे अनेक प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. यासंबंधीचा कोणताही विचार प्रशासनाकडून केलेला नाही.

वृक्ष तोडल्यास त्यांचे काय करणार ?
एनआयबीएम ही सरकारी संस्था आहे, त्यामुळे या संस्थेच्या आवारातील चंदनाचे वृक्ष ही सरकारी मालमत्ता आहे. या 60 वृक्षांतून काही लाखांचे चंदन मिळणार आहे. त्यामुळे या तोडलेल्या वृक्षांचा लिलाव करणार की आणखी काय, हा प्रश्न निरुत्तर आहे. त्यावर हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रसाद काटकर यांनी हे वृक्ष काढण्यास परवानगी मिळाल्यास त्या वृक्षांचे मूल्यांकन करून रक्कम ठेकेदाराकडून आपल्या कोषागारात भरून घेणार किंवा त्यांचा लिलाव करणार का याबाबत एनआयबीएमला हमीपत्र सादर करण्यास सांगितले आहे.

चोरी होतेय म्हणून चंदनाचे वृक्ष काढण्याची परवानगी म्हणजे अजबच प्रकार आहे. त्यापेक्षा चोरी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे आणि महापालिकेनेही तशीच भूमिका घेण्याची आवश्यता आहे. हा प्रस्तावच शंकास्पद आहे. हे वृक्ष तोडण्याची परवानगी दिल्यास त्याविरोधात आम्ही वृक्षप्रेमी आवाज उठवू.

                                                नंदू कुलकर्णी, निसर्ग अभ्यासक

SCROLL FOR NEXT