Latest

पोस्ट, कुरिअरमधून अमली पदार्थांची तस्करी : देवेंद्र फडणवीस

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यात अमली पदार्थांचा धोका वाढला असून, यामध्ये नवनवीन पद्धती वापरल्या जात असल्याची कबुली देतानाच, या तस्करीसाठी पोस्ट आणि कुरिअरसारख्या यंत्रणांचाही गुन्हेगारांकडून वापर होत आहे, अशी धक्कादायक माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. पोस्ट, कुरिअरबरोबरच इंटरनेटवरील डार्कनेटद्वारे व्यवहार केले जातात. जलमार्गाने कंटेनरमधून अमली पदार्थ मुंबईत आणले जातात, असे फडणवीस यांनी सांगितले. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यामध्ये शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त येणार्‍या परदेशी नागरिकांच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री होत असून, त्यात तरुण पिढी बरबाद होत आहे, याकडे लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी या लक्षवेधीवर उत्तर देताना, राज्यात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी गुन्हेगारांकडून सध्या कुरिअर, पोस्टाचा वापर वितरणासाठी केला जात आहे. डार्कनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तिगत मेसेजेस देण्यात येतात. सप्लाय चेनच्या माध्यमातून हे सर्व व्यवहार चालतात, असे सांगितले. काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, भाजपचे समीर मेघे यांनीही या लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेतला.

प्रशासनातील कुणी सापडले, तर थेट बडतर्फी

तस्करीबाबत पोलिसांनाही माहिती असते; पण ते कारवाई करत नाहीत, असा आरोप आव्हाड यांनी केला. त्यावर अमली पदार्थांच्या विक्रीत सहाय्य करताना कोणी पोलिस किंवा प्रशासनातील कोणी आढळल्यास त्याला सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी विधानसभेत केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT