लाहौर, वृत्तसंस्था : पाकिस्तानातील इस्लामिया यनिव्हर्सिटी ऑल बहावलपूरमध्ये (आययूबी) ड्रग्ज आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. प्राध्यापकांचे एक टोळके विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काही जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या फोनमध्ये विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. या व्हिडीओंच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल केले जायचे.
पाकिस्तान सरकारने हे प्रकरण दाबण्याचा खूपच प्रयत्न केला, मात्र द डॉन या वृत्तपत्राने एका अहवालातून या स्कॅडंलचा बुरखा फाडला आहे. विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकार्याची हकालपट्टी करून त्याला अटक करण्यात आली आहे. द डॉन या वृत्तपत्राने या प्रकरणाचा तपशील प्रकाशित केला असून यामध्ये पोलिसांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, विद्यापीठातील ड्रग्ज रॅकेटची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. विद्यापीठातील काही प्राध्यापक ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले होते. छाप्यात एका प्राध्यापकाकडून हेरॉईनही जप्त करण्यात आले.
जूनपासून पोलिस तपास सुरू होता, मात्र आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले नसल्याने त्यांच्यावर कोणतीही करण्यात आली नाही. पुरावा मिळाल्यानंतर 28 जून रोजी विद्यापीठाच्या मुख्य वित्त अधिकार्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडूनही ड्रग्ज जप्त करण्यात आले.
विद्यापीठात प्राध्यापकांडून ड्रग्ज, डान्स आणि सेक्स पार्टींचे आयोजन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अनेक विद्यार्थिनींवर बलात्कार
आता या प्रकरणाची चौकशी विशेष गुन्हे अन्वेषण शाखेकडून केली जात असून आरोपींनी विद्यापीठात ड्रग्जची विक्री केली जात असल्याची कबुली दिली आहे. विद्यार्थिनी आणि महिला प्राध्यापकांना विशेष ठिकाणी बोलवून डान्स आणि ड्रग्ज पार्टी आयोजित केली जात होती. विद्यार्थिनींना टॉर्चर करून त्यांच्यावर अनेकवेळा बलात्कार केला जात असल्याचे समोर आले असून 11 विद्यार्थी या रॅकेटमध्ये सहभागी होते. मुलींच्या अश्लील व्हिडीओजचे स्क्रीन शॉटस् सोशल मीडियावर शेअर केले गेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.