पाल्लेक्केले, वृत्तसंस्था : टीम इंडियाच्या (IND Vs NEP) खराब क्षेत्ररक्षणामुळे नेपाळला पहिल्या 20 चेंडूंत तीन संधी मिळाल्या. टीम इंडियाचे स्टार क्षेत्ररक्षक विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी नेपाळच्या सलामीवीरांचे सोपे झेल सोडले. यानंतर कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसत होता.
नेपाळचा सलामीवीर कुशल भुर्तेलचा मोहम्मद शमीच्या पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने स्लीपमध्ये सोपा झेल सोडला.
पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कॅच सुटल्यानंतर विराट कोहलीने दुसर्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर घोडचूक केली. यावेळी आसिफ शेखला जीवदान मिळाले. एवढा साधा झेलही विराट चुकवू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.
नेपाळच्या डावातील तिसरा झेल इशान किशनने सोडताच रोहित चांगलाच संतापला होता. इशानने पाचव्या षटकात मोहम्मद शमीच्या चेंडूवर कुशल भुर्तेलचा यष्टीमागे सोपा झेल सोडला. यानंतर रोहितने आपले दोन्ही हात पुढे करून नाराज प्रतिक्रिया दिली. नेपाळला पहिल्या 5 षटकांत तीन संधी मिळाल्यानंतर त्यांची धावसंख्या 10 षटकांपूर्वीच 60 च्या पुढे गेली. जिथे एकीकडे गोलंदाज सतत विकेटस्च्या संधी निर्माण करत होते, मात्र खेळाडूची साथ मिळत नव्हती. (IND Vs NEP)
भारतीय क्षेत्ररक्षकांच्या या हलगर्जीपणावर समालोचक रवी शास्त्री हाही भडकला. नेपाळला कमी लेखून भारतीय खेळाडू मैदानात उतरलेले दिसत होते. त्यांचे डोळे उघडेपर्यंत तीन झेल सुटले होते, असे तो म्हणाला. आता वर्ल्डकप तोंडावर असताना अशा चुका भारताला महागात पडू शकतात, असेही शास्त्री म्हणाला.