Latest

‘क्रेमलिन’वरील ड्रोन हल्ल्याच्या मुळाशी!

Arun Patil

क्रेमलिन कॉम्प्लेक्समध्ये दरवर्षी 9 मे रोजी रशियाने दुसर्‍या महायुद्धात नाझी जर्मनीवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी भव्य परेड आयोजित केली जाते. यावर्षी होणार्‍या व्हिक्टरी परेडच्या काही दिवस आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना मारण्याच्या उद्देशाने 'क्रेमलिन'वर ड्रोन हल्ला करण्यात आला. वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रीगोक्षिन यांच्या मते, ही युक्रेनच्या हल्ल्याची सुरुवात आहे. तथापि, या हल्ल्याबाबत काही शंकात्मक प्रश्नही निर्माण झाले असून, त्यांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. युद्ध जिंकायचे असेल, तर शत्रूच्या नेत्याला मारून टाका, हा परंपरागत लष्करी सिद्धांत आहे.

तीन आणि चार मे 2023 च्या रात्री रशियातील क्रेमलिनच्या आकाशात झालेल्या नाटकामागे हाच सिद्धांत होता. त्या रात्री रशियाने दोन कामेकाझी ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. या कामेकाझी ड्रोन्सचे लक्ष्य मॉस्कोमधील क्रेमलिन कॉम्प्लेक्स होते. यांचा वापर करून युक्रेनने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रशियाने केला आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे दोननंतर, क्रेमलिन कॉम्प्लेक्सच्या भिंतींमागे दोन स्फोट झाल्याची बातमी प्रसारित झाली. अधिकृत सूत्रांनुसार,

रशियन स्पेशल फोर्सेसनी हे दोन्ही ड्रोन त्यांच्या लक्ष्यावर पोहोचण्याआधीच विशेष इलेक्ट्रॉनिक रडार सेवांचा वापर करून अक्षम केले. त्यावेळी पुतीन क्रेमलिनमध्ये नव्हते. या हल्ल्यात क्रेमलिन कॉम्प्लेक्स आणि तेथील इमारतींचे कोणतेही भौतिक नुकसान झालेेले नाही; पण माध्यमांमध्ये मॉस्कोवर धुराचे लोट दाखवले जात होते. रशियाच्या दाव्यानुसार युक्रेन सरकारने राष्ट्राध्यक्षांच्या क्रेमलिनमधील निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ड्रोन या मानवरहीत हवाई वाहनांच्या दहशतवादी प्रयोगाने रशियन राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा हा नियोजित प्रयत्न आम्ही विफल केला. याविरोधात रशियाने जेव्हा, जिथे आणि योग्य वाटेल त्या पद्धतीने, योग्य वेळी सुडाचे पाऊल उचलण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी पुनरुच्चार केला आहे की, आता वोल्दिमीर झेलेन्स्की आणि त्यांच्या लष्कराच्या शारीरिक निर्मूलनाशिवाय इतर कोणताही पर्याय शिल्लक नाही. युक्रेनचे बिनशर्त आत्मसमर्पण स्वीकारण्यासंबंधीच्या विचारांना आता तिलांजली देऊन या घटनेचा योग्य तो सूड घेतला जाईल. क्रेमलिनवर झालेल्या ट्विन ड्रोन हल्ल्याविरोधात योग्य ते प्रतिशोधात्मक उपाय केले जातील, हे मॉस्कोनी स्पष्ट केले आहे. या हल्ल्यामध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना कोणतीही दुखापत झाली नाही आणि त्यांनी त्यांचे सामान्य वेळापत्रक (रेग्युलर रुटिन) सुरूच ठेवले आहे. असे म्हटले जाते की, आपल्या सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून पुतीन हे नियमितपणे त्यांच्या बॉडी डबल्सचा वापर करतात. मात्र, पुतीन यांनी याचा स्पष्ट इन्कार केला आहे. हल्लेखोर ड्रोनची काही शकले किंवा तुकडे क्रेमलिनवर पडले असून, त्यांची रासायनिक तपासणी (फॉरेन्सिक एक्सामिनेशन) केली जात आहे.

क्रेमलिन कॉम्प्लेक्समध्ये दरवर्षी नऊ मे रोजी रशियाने दुसर्‍या महायुद्धात नाझी जर्मनीवर मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी भव्य परेड आयोजित केली जाते. यावर्षी होणार्‍या व्हिक्टरी परेडच्या काही दिवस आधी हा स्ट्राईक करण्यात आला आहे. क्रेमलिन स्क्वेअरमध्ये होणार्‍या या भव्य दिव्य परेडला सर्वसाधारणपणे रशियातील सर्व परदेशी मुत्सद्दी आणि लष्करी मान्यवर आणि काही आमंत्रित परदेशी पाहुणे उपस्थित असतात. रशिया सध्या या परेडच्या आधी अतिरिक्त सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करत आहे. सार्वजनिक कार्यक्रम मर्यादेत राखण्यासाठी युक्रेन युद्धाशी संबंधित सुरक्षा चिंता (सिक्युरिटी कन्सर्न्स) आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सध्या निर्णायक टप्प्यात आहे. युक्रेन तीव्र हिवाळ्यानंतर रशियावर जबरदस्त प्रति हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

– अभय पटवर्धन, कर्नल (निवृत्त)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT