नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी चांगुलपणाचे राष्ट्रीय शिखर संमेलन होत असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या संमेलनात डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना 'चांगुलपणाचा जीवनगौरव' पुरस्कार दिला जाणार आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामवंतांचाही यावेळी सत्कार केला जाईल.
माजी राष्ट्रपती कोविंद तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष अरुण मिश्रा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल तर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे, परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, एअर मार्शल अजित भोसले, नोंगामैथम सिंग, दलास ग्रुपचे सहसंस्थापक संजीव खन्ना हे सामील होणार आहेत.
संविधानातील स्वातंत्र्य, समता व न्याय या मूल्यांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम घेणे, समाजात प्रत्यक्षात तळागाळात जाउन सामाजिक कार्य करणे हा चांगुलपणाच्या चळवळीचा उद्देश आहे. चांगुलपणाची चळवळ माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे. समाजात चांगुलपणा कसा रुजविता येईल, यावर संमेलनाच्या विविध सत्रांमध्ये मंथन होईल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा