Latest

हुपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीचे जतन; महापरिनिर्वाण दिनी दर्शनासाठी खुल्या

अनुराधा कोरवी

हुपरी : अमजद नदाफ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी चंदेरीनगरी हुपरी (ता. हातकणंगले) येथे अत्यंत प्राणपणाने व श्रद्धापूर्वक गेली ६७ वर्षे जपून ठेवल्या आहेत. मुंबईच्या चैत्यभूमीनंतर एकमेव हुपरी येथे या पवित्र अस्थी आहेत. कोट्यवधी भारतीयांची श्रद्धा असलेल्या या अस्थींमुळे हुपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बुधवारी (दि. ६ डिसेंबर) रोजी महापरिनिर्वाण दिनी या अस्थी दर्शनासाठी खुल्या करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महानिर्वाण झाले. त्यावेळी संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. या महामानवाला निरोप देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून चैत्यभूमीवर भीमसागरच अवतरला होता. हुपरी येथूनही अनेक अनुयायी मुंबईस गेले होते. डॉ. आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी मिळवायच्या, असा निश्चय त्यांनी केला होता. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही डॉ. आंबेडकर यांच्या अस्थी त्यांनी मिळवल्या व ते सर्वजण हुपरीत आले. या अस्थींच्या दर्शनासाठी त्यावेळी हुपरी येथे जनसागर उसळला होता.

संपूर्ण जगात महत्त्वपूर्ण अशी राज्यघटना लिहिणाऱ्या महामानवाच्या अस्थी म्हणजे अमूल्य ठेवाच आहे. तेव्हापासून येथील दलित बौद्ध समाज या अस्थींचे प्राणपणाने जतन करत आहे. या ठिकाणी भव्य स्मारकाची निर्मिती झाली आहे. तर चैत्यभूमीची भव्य उभारणीही झाली आहे. त्यामुळे या परिसराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. 'दैनिक पुढारी'ने सर्वप्रथम या अनमोल ठेवा असणाऱ्या पवित्र अस्थी हुपरीत असल्याचे महत्वपूर्ण वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते.

बुधवारी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र अस्थी दर्शनासाठी खुल्या करण्यात येणार असून सामूहिक अभिवादन कार्यक्रम होणार आहे. या अस्थी चांदीच्या कलशात सुरक्षित जतन केल्या आहेत. मुंबईच्या चैत्यभूमीची भव्य प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे. महाराष्ट्र -कर्नाटक राज्यातील जनता येथे दरवर्षी अस्थीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येते असतात.

SCROLL FOR NEXT