Latest

डॉ. आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापुरात!

Arun Patil
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या कार्याचा गौरव राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरात अनोख्या पद्धतीने करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील पहिला पुतळा 73 वर्षांपूर्वी त्यांच्या हयातीतच कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात उभारण्यात आला. सामाजिक क्रांतीची साक्ष देणारे हे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. स्मारक उभारणीचा अमृत महोत्सव 2025 मध्ये होणार आहे.
डॉ. बाबासाहेबांचा गौरव म्हणून त्यांचा पुतळा कोल्हापुरात उभारावा, यासाठी डॉ. आंबेडकर पुतळा प्रतिमा समितीची स्थापना करण्यात आली. भाई माधवराव बागल यांच्या अध्यक्षतेखालील समितीत तत्कालीन नगराध्यक्ष द. मा. साळोखे, मा. ई. कुरणे, भिवा सरनाईक, गणपत पोवार, गंगाराम कांबळे, व्ही. जी. चव्हाण, यशवंत सुळगावकर, शांताराम सरनाईक, शामराव बनगे, बळवंत सरनाईक, मसू लिगाडे, मा. ता. मोरे, बाळ चव्हाण, रामकृष्ण कदम, सहदेव बनगे, चंद्रकांत लिगाडे, हरी सरनाईक आदींचा समावेश होता. या समितीने देशाची राजधानी दिल्ली येथे जाऊन डॉ. आंबेडकरांची भेट घेऊन कोल्हापुरात पुतळा उभारणीविषयी सांगितले. मात्र, बाबासाहेबांनी याला नम्रपणे नकार दिला. यामुळे समितीचे सदस्य नाराज झाले. याची माहिती मिळताच डॉ. आंबेडकरांनी समिती सदस्यांना परत बोलावून पुतळ्यासाठी परवानगी दिली.
राजर्षी शाहूंकडून लोकमान्य पदवी
सन 1919 मध्ये मुंबई येथील भेटीत राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांना कोल्हापुरात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार ते कोल्हापुरात येताच बग्गीतून त्यांची भव्य मिरवणूक काढली. सोनतळी कॅम्पवर राजेशाही भोजन आणि मुंबईला परतताना जरीपटका देऊन सत्कारही केला. माणगाव परिषदेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. यावेळी दलित समाजाला डॉ. आंबेडकर यांच्या रूपाने नेतृत्व मिळाल्याचे राजर्षी शाहूंनी जाहीर केले. दरम्यानच्या पत्रव्यवहारात राजर्षी शाहूंनी डॉ. आंबेडकर यांना 'लोकमान्य' अशी पदवी देऊन विशेष गौरव केला होता.
SCROLL FOR NEXT