Latest

हत्तीही एकमेकांना विशिष्ट नावाने ओळखतात?

Arun Patil

लंडन : हत्ती जेव्हा नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात समूहाने फिरत असतात, त्यावेळी ते त्यांच्या वैयक्तिक नावावरून एकमेकांशी संवाद साधतात, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. संशोधकांना असे पुरावे मिळाले आहेत की, केनिया या आफ्रिकन राष्ट्रातील जंगली हत्ती एकमेकांना विशेष नावाने पुकारतात. विविध स्वरांमध्ये ते आपल्या मित्रांना आवाज देतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात. हे जगाने मात्र अद्याप स्वीकारलेलं नाही; पण हे जगाने मान्य केल्यास हत्ती हा जगातील पहिला प्राणी होईल, जो आपल्या साथीदारांना नावाने हाक मारतो. आतापर्यंतच्या इतिहासात हे फक्त मानवानेच केलेलं आहे.

डॉल्फिन माशाच्या प्रकारातील एक असलेले बॉटलनोज डॉल्फिन हे देखील काही व्यक्तींना सिग्नेचर शिट्ट्या वाजवून बोलवू शकतात. मात्र, शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, हे माणूस ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला बोलावतो त्यापेक्षा हे थोडं वेगळं आहे. जसं की, आपली नावं ही कोणत्या विशिष्ट स्वरात घेतली जात नाहीत, तर आपल्या नावात शब्द असतात, ज्यामागे सामान्यतः सांस्कृतिक पद्धती आणि अर्थ दडलेले असतात. मानवी नामकरणाचा हा एक स्वभाव आता हत्तींनाही लागू होताना दिसत आहे. हत्ती हे त्यांच्या मोठ्या आवाजासाठी ओळखले जातात, परंतु त्यांचा बराचसा संवाद मानवाला ऐकू येत नाही.

विशिष्ट ध्वनी लहरींच्या माध्यमातून हत्ती हे त्यांच्यापासून सहा किलोमीटर दूर असलेल्या इतर हत्तींच्या पायापर्यंत संदेश पोहोचवू शकतात. हा आवाज मानवाला जरी समजला नाही, तरी तो त्या विशिष्ट साथीदार असलेल्या हत्तीला त्वरित समजतो. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हत्ती त्यांच्या दिवसाचा बहुतेक भाग अन्न शोधण्यात घालवतात आणि त्या प्रयत्नात कळपातून त्यांची वाट चुकू शकते. अशावेळी एकमेकांचं नाव ठेवणं, त्यांना नावाने हाक मारणं हा एक उत्तम पर्याय असतो. एकमेकांना विशिष्ट स्वरात आवाज देऊन ते साथीदारांचा मागोवा घेतात. ही शक्यता शोधण्यासाठी पारडो आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केनियामधील दोन वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात हत्तींच्या आवाजाची नोंद करण्यात तासन्तास घालवले. ज्यामध्ये टीमला काही पुरावे सापडले असून हत्ती एकमेकांशी बोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

SCROLL FOR NEXT