Latest

महाराष्ट्रात आजवर रंगलेले काका पुतण्यांचे वाद, जाणून घ्या सविस्तर…

अमृता चौगुले

ज्ञानेश्वर बिजले

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्राच्या राजकारणातील काका पुतण्यांमधील संघर्ष पवार घराण्यातील वादाने आता पुन्हा चर्चेत आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि आता माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात त्यांच्या पुतण्यानीच बंड केले. पहिल्या दोन्ही संघर्षापेक्षा सध्याचा संघर्ष महाराष्ट्रात येत्या निवडणुकीपर्यंत दिवसेंदिवस तीव्र होत जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

सत्ता आणि अधिक सत्ता हीच या वादांमागची खरी कारणे आहेत. महाराष्ट्रात असे वाद वारंवार घडल्याचे दिसून येते. सर्वात मोठ्या ऐतिहासिक वादाकडे पाहिल्यास, पुण्यात शनिवारवाड्यातील नारायणराव पेशव्यांची 'काका मला वाचवा' ही आर्त किंकाळी आज इतिहासाचे पान बनली. पुढील महिन्यात 30 ऑगस्टला या घटनेला अडीचशे वर्षे पुर्ण होतील. नारायणरावाचे वय जेमतेम 18 वर्षे होते, तर सात-आठ महिने त्यांनी पेशवे पदाचा कारभार पाहिला. गारदी हल्ला करणार असल्याचे कळूनही त्यांनी दुर्लक्ष केले आणि त्यांना जीव गमवावा लागला. त्यांच्या पश्चात नारायणरावाचा मुलगा सवाई माधवराव यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. पण कारभार मात्र बारभाई मंडळाने विशेषतः नाना फडणवीस यांनी मुख्यत्वे पाहिला. महाराष्ट्रातील काका-पुतण्याचा हा पहिला संघर्ष देशाच्या इतिहासाच नोंदला गेला.

इंग्रजांची सत्ता गेल्यानंतर देशात लोकशाही आली. मात्र, सरंजामशाहीतून देश तसाही मुक्त झालाच नाही. नेत्यांच्या कुटुंबांतील सदस्यच त्या-त्या भागात सत्ता गाजवित राहिले. परिवारवाद हा खरे तर राजकारणात सर्वच पक्षात कमी अधिक प्रमाणात सुरूच आहे. मात्र, मोठे नेते जेव्हा स्वतःचा मुलगा अथवा मुलगी यांना पुढे आणतात, तेव्हा त्यापूर्वी त्या नेत्यासोबत कर्तृत्व दाखवित पुढे येत असलेल्या पुतण्याला डावलले गेले. त्यामुळे पुतण्यांनी बंड केले. महाराष्ट्रातच गेल्या दोन दशकात काका-पुतण्याच्या अशा तीन जोड्या राजकीय क्षितीजावर गाजल्या. मात्र नेत्यांच्या छत्र छायेत पुढे आलेल्या त्यांच्या मुलामुलींनीही प्रगतीची चौखूर उधळण केली.

राज ठाकरे यांचा संघर्ष

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत पहिल्यापासून आक्रमक शैलीने भाषण करणाऱ्या राज ठाकरे यांना कालांतराने पक्ष सोडावा लागला. राज यांनी 1990 मध्ये विद्यार्थी सेनेचे स्थापना करीत सुत्रे हाती घेतली. भाजप-शिवसेना सत्तेवर आली. त्यानंतर बाळासाहेब यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांचा पक्षातील दबदबा वाढू लागला. ते 2002 मध्ये पक्षाचे प्रचारप्रमुख झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका जिंकल्यानंतर 2003 मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख झाले. राज ठाकरे यांनीच तो प्रस्ताव मांडला. त्यानंतर राज ठाकरे मागे पडू लागले. त्यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडली आणि स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केला. त्यानंतर या दोन चुलतभावातील संघर्ष वाढतच गेला. वक्तृत्वाच्या जिवावर राज यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. उद्धव ठाकरे यांनीही पक्षाचे व्यवस्थापन नीट सांभाळत 2014 मध्ये स्वबळावर 63 आमदार निवडून आणले. 2019 मध्ये ते काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यांच्या पक्षातून 40 आमदार बाहेर पडल्याने, गेल्या वर्षी त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. आता राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे, अशी काही कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, येत्या निवडणुकीपूर्वी याची शक्यता धूसर वाटते.

मुंडे घराण्यातील वाद

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी मोठा संघर्ष केला. भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी राज्यात ज्या नेत्यांनी संघर्ष केला, त्यामध्ये मुंडे आघाडीवर होते. त्यांचा पुतण्या धनंजय मुंडे यांनी भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या परळी मतदारसंघातून त्यांची मुलगी पंकजा हिला 2009 मध्ये उमेदवारी मिळाली. त्यानंतर घरात संघर्ष झाला आणि धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. राष्ट्रवादीने त्यांना 2010 मध्ये विधानपरिषदेत आमदार केले. देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यानंतर 2014 मध्ये ते विरोधी पक्षनेते झाले. पंकजा मुंडे मंत्री झाल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी प्रितम गेली दहा वर्षे बीडच्या खासदार आहेत. 2019 मध्ये परळी मतदारसंघात बहीण भावात लढत झाली, तेव्हा धनंजय मुंडे विजयी झाले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री झाले. त्यांचे आणि फडणवीस यांचे सलोख्याचे संबंध असल्याची चर्चा आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या संघर्षात धनंजय मुंडे अजित पवाराच्या बाजुने वळाले. त्यांना मंत्रीपदही मिळाले. राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केले. तर पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस बनल्या. त्यांना पक्षाकडून पुन्हा आमदारकी मिळालेली नाही. त्या काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे अफवांचे त्यांनी खंडन केले. मात्र, दोन महिने त्यांनी राजकारणातून सुटी जाहीर केली आहे. बहीणभावांनी चांगले वक्तृत्व आणि कार्यकर्त्यांचा पाठींबा यांच्या जोरावर आपले स्थान मिळविले.

पहिल्या दोन्ही संघर्षाकडे पाहिले तर काका आणि पुतण्यांमध्ये थेट संघर्ष झाला नाही. तिसरा संघर्ष सध्या गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात पाहण्यास मिळतो, तो काका आणि पुतण्यात थेट सुरू झाला आहे. राज्यातील पुढील निवडणुकीच्या दृष्टीने या संघर्षाला विविध परिमाणे मिळणार आहेत. राज्यातील राजकीय समीकरणे या वादाने बदलली, बिघडली.

पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 1967 मध्ये आमदार झाले. पुलोद स्थापन करीत 1978 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर, गेली 45 वर्षे राज्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्व अद्यापही कायम आहे. त्यांनीच अजित पवार यांनी 1991 मध्ये थेट लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. त्यावेळी पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत होते. पवार संरक्षणमंत्री झाल्यानंतर, अजित पवार हे त्यांच्याजागी आमदार झाले. तेव्हापासून ते गेली तीस वर्षे बारामतीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीची स्थापना 1999 मध्ये झाली. त्यावेळी राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता आली. तेव्हापासून अजित पवार मंत्री होते. उपमुख्यमंत्री झाले. अनेक महत्त्वाची खाती त्यांना मिळाली. उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले. त्याच दरम्यान शरद पवार यांनी त्यांच्या एकुलत्या एक कन्या सुप्रिया सुळे यांना 2006 मध्ये राज्यसभेवर निवडून आणले. सुप्रिया या 2009 पासून सलग तीनवेळा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या.

पवार यांचा वारसदार कोण याची चर्चा अधूनमधून सुरू असते. मात्र, राष्ट्रीय पातळीवर सुप्रिया सुळे, तर राज्यात अजित पवार अशी विभागणी झाली होती. शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करणार असल्याची चर्चाही अधूनमधून सुरू असते. पवार यांनी सर्व सहकाऱ्यांना मंत्री केले, काही ना काही पद दिले, मात्र मुलीला काही पद दिले नाही, असा कंगोराही या चर्चेला असतो.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटातील सुप्त संघर्ष गेली काही वर्षे वाढत चालला होता. कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून ते जाणवत होते. अजित पवार यांचा ओढा विरोधी पक्षाकडून राजकारण करण्यापेक्षा भाजपकडे जाण्याकडे अधिक होता. राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यासाठी गेले सहा महिने हालचाली सुरू ठेवल्या. त्यातच अजित पवार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या संस्थांनी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीही सुरू केली होती.

अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यामागे सुमारे 35 आमदारांचे पाठबळ उभारले. त्याचवेळी शरद पवार यांनी अजित पवार व त्यांच्या सोबत नऊ मंत्र्यांना, दोन खासदारांना पक्षातून काढून टाकले. शरद पवार यांनी प्रचार दौऱ्याचा प्रारंभही केला आहे.

पवार यांच्यातील संघर्षाचे पडसाद मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात उमटतील. त्याचबरोबर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही हा वाद रंगणार आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे सध्यातरी पक्षात मोठी जबाबदारी आली आहे. त्यातच शरद पवार यांचे नातू आमदार रोहीत पवार यांनीही आता सोशल मिडियावर बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हा वाद आता पुणे जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात वाढत जाईल. मात्र, त्यामुळे भाजपसह अन्य पक्षांच्या विस्ताराला मर्यादा येणार आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT