Latest

Diwali Festival : दिवाळीतील अभ्यंग स्नानाचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाइन डेस्क : Diwali Festival : दिवाळी सण जितका दिव्यांचा उत्साहाचा, फटाक्यांचा आहे तितकाच या सणात आवर्जून पाळल्या जाणा-या परंपराचा आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव जो तिमिरातून तेजाकडे नेतो. यामध्ये आरोग्याचा विचार केला नसेल असे कसे होईल. दिवाळीच्या परंपरांमध्ये फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक भावनिक आरोग्याचा देखिल मोठ्या प्रमाणात विचार करण्यात आला आहे. त्यापैकीच एक परंपरा म्हणजे अभ्यंग स्नान. दिवाळी आणि अभ्यंग स्नान यांचं एक घट्ट नातं आहे. पण हे तेवढ्यापुरतेच मर्यादित नाही. तर दिवाळीपासून पुढे थंडी संपेपर्यंत अभ्यंग स्नान करावे असा निर्देश त्यात देण्यात आला आहे. मात्र, आपण फक्त दिवाळी पुरतेच त्याला परंपरा म्हणून मर्यादित ठेवल्याने त्याचे आरोग्यदायी फायदे मिळत नाही. म्हणूनच अभ्यंग स्नान आणि आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया!

Diwali Festival : अभ्यंग स्नान काय आहे?

सुर्योदयापूर्वी उठून अंगाला तिळाच्या तेलाने संपूर्ण मालिश करून ते चांगले मुरवायचे असते. नंतर दुधात उटणे कालवून सर्वांगाला उटणे लावावे. त्याने अतिरिक्त तेल काढून टाकावे. नंतर गरम पाण्याने स्नान करून घ्यावे. याला अभ्यंग स्नान म्हणतात.

Diwali Festival : आरोग्यासाठी फायदे

तिळाच्या तेलाने त्वचा मुलायम बनते

अभ्यंग स्नानासाठी शक्यतो तिळाचे तेल वापरावे असा एक निर्देश आहे. कारण दिवाळीपासून थंडीची सुरुवात होत असते. थंडीत त्वचा फाटून कोरडी पडणे, भेगा पडणे असे प्रकार होतात. त्यावर सर्वोत्तम रामबाण उपाय म्हणजे तिळाचं तेल. तिळाचं तेल हे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असते. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. भेगा पडणे, सुरकुत्या पडणे, चेह-यावरील डाग हे सर्व निघून आपली संपूर्ण काया तजेलदार होते.

मालीश केल्याने वातविकार दूर होतात, चरबी कमी होते

तिळाचे तेल हे वातविकार दूर करणारे असते. त्यामुळे अभ्यंग स्नान करताना तिळाचे तेल कोमट करून सर्वांगाला उत्तम मालीश करून घ्यावी. यामुळे शरीरात मान, कंबर, पोट, मांड्या, पोट-या यांवर चढलेला वात अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. वात कमी झाल्याने त्यायोगे होणारे रोग कमी होतात. जसे की कंबर दुखी, मान दुखी…

थकवा दूर होतो

अतिश्रम किंवा कष्टाचे काम करणा-या व्यक्तिंसाठी अभ्यंग स्नानासाठी तिळाच्या तेलने मालीश करणे खूप फायदेशीर ठरते. यामध्ये थकवा दूर होतो. तसेच शरीर हलके होऊन चांगले सक्रिय होतात.

Diwali Festival : प्रेम आणि भावनिक जिव्हाळा निर्माण होतो

साधारणपणे अभ्यंग स्नानासाठी तेलाने घरीच आपल्या माणसांकडून मालिश करून घेतली जाते. त्यामुळे आपोआपच एकमेकांमध्ये प्रेम आणि भावनिक जिव्हाळा निर्माण होतो. एकमेकांच्या आरोग्याची आपुलकीने काळजी घेतली जाते.

मालीश किंवा मसाज कसा आणि केव्हा करावा

तिळाचे तेल कोमट करून पायापासून डोक्याकडे अशा पद्धतीने मसाज करावा. आधी तळपाय, पाय, पायाच्या पोट-या, नंतर मांड्या, पोट कंबर, नंतर छाती, मान आणि चेहरा, अशा पद्धतीने मालीश करावी. किमान 15 मिनिटे ही मालिश करावी. तेल अंगात मुरायला हवे. हदयाच्या दिशेने चोळून घ्यावे. पोट, पाठ आणि छातीची मालीश करताना बरोबर मध्यभागातून पंख्याला समांतर असे चोळावे. शक्यतो सुर्योदयापूर्वी तेलाने मालीश करून घ्यावी.

Diwali Festival : उटणे शरीराला स्वच्छ करून मनाला आनंदी बनवते

उटणे हे अनेक प्रकारच्या सुगंधी वनौषधींने बनवले जाते. ज्यामध्ये केसर, कस्तुरी, कापूर, वाळा, सुगंधी कचुरी अशा वेगवेगळ्या औषधी गुणधर्मांनी युक्त वनस्पतींचे चूर्ण असते. हे मालीश केल्यानंतर शरीरावरील उरलेले अतिरिक्त तेल स्वच्छ करते. तसेच शरीरावरील अनावश्यक केस बारीक-बारीक लव दूर करते. चेह-याचे सौंदर्य उजळवते. तसेच यातील सुंगधी द्रव्यांमुळे मन प्रसन्न राहते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT