Latest

दिवाळी पाडव्याची महती

Arun Patil

बलिप्रतिपदेदिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केल्यानंतर पत्नी पतीला ओवाळते. दुपारी पंचपक्वान्नांचे भोजन केले जाते. दिवाळीतील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा आणि फुले खोचतात आणि कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी आहे. या दिवशी बलिराजाचे स्मरण केले जाते आणि विक्रम संवतची सुरुवात होते. बलिप्रतिपदेविषयी…

बलिप्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. ज्याप्रमाणे आपले कालगणनेचे वर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते, तसेच व्यापार्‍यांचे वर्ष ते कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच दिवाळी पाडव्याला सुरू होते. म्हणूनच या दिवशी वहीपूजनाला आणि दुकानाच्या पूजनालाही खूप महत्त्व आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानलेला आहे. त्यामुळे या दिवशी वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी, नवीन व्यवहार यांची सुरुवात करून दिवस खूप आनंदात घालवावा, असे सांगितले गेले आहे. या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते व नैवेद्य दाखवला जातो. यानंतर दीप आणि वस्त्रे यांचे दान केले जाते. या पूजेच्या वेळी 'इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना केली जाते. थोडक्यात या दिवशी बलीचे स्मरण केले जाते.

आर्थिकद़ृष्टीने व्यापारी बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात आणि हिशेबाच्या नव्या वहीचे पूजन करतात आणि त्या वहीचा वापर सुरू करतात. या दिवशी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचा दिवाळसण असतो. लग्नानंतरची त्यांची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते आणि जावयाला आहेर केला जातो.

भारतात सगळीकडे हा सण साजरा करतात. भविष्योतर पुराणात दिवाळीला कौमुदी म्हणतात. गुजरातमध्ये वसुबारसला अंगणात वाघाचे चित्र काढतात आणि ते भाऊबीजेपर्यंत ठेवतात. त्याला वाघवाराम असे म्हणतात; तर प्रतिपदेला काळभैरवाची पूजा करतात. बलिप्रतिपदेला राजस्थानी लोक अन्नकोट करून ते अन्न दान करतात. ही पद्धत बर्‍याच ठिकाणी दिसून येते.

दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक प्रकारे कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्यदेखील राखले जाते. हादेखील सण साजरे करण्यामागचा खूप मोठा सामाजिक उद्देश आहे. इतर सणांच्या निमित्ताने निसर्गातील वेगवेगळ्या प्राणिमात्रांची आठवण राखण्यासाठी त्यांचे पूजन करत असतो. यामध्ये नागपंचमी, पोळासारख्या सणांचा समावेश होतो. पण दिवाळी हा सण पूर्णपणे सामाजिक स्वास्थ्य राखणारा सण आहे. कारण दिवाळीच्या दिवसांमध्ये मालक आणि नोकर यांच्यातील संबंध देखील खूप चांगले राहतात. दिवाळीनिमित्त काम करणार्‍यांना भेट किंवा बोनसच्या स्वरूपात काहीतरी दिले जाते. तसेच कुठेही न घडणारी गोष्ट म्हणजे पत्नीने पतीला ओवाळावे आणि त्यानिमित्ताने आयुष्य मागून घ्यावे, पतीकडून आपला सत्कार करून घ्यावा, असा कौटुंबिक स्वास्थ्य राखणारा विधी आपण या सणाच्या निमित्ताने करत असतो.

पाडवा असो वा भाऊबीज, दिवाळी हा सण सर्व प्रकारच्या नात्यातून संबंध स्नेहाचे आणि द़ृढ करण्यासाठी असतो, असे म्हणता येऊ शकते. यामुळे आपले कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य राखण्यास खूप मदत होते. अनेक प्रकारचे मनातील किंतू, मतभेद विसरून हा सण आपण आनंदाने साजरा करूया, अशी एक संकल्पना सगळ्यांच्या मनात ठाम झालेली आहे. या सणाच्या निमित्ताने संपूर्ण बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. व्यापार्‍यांची आर्थिक घडी बसण्यासाठीसुद्धा हा सण फार महत्त्वाचा असतो. यामध्ये सोने-चांदीपासून हार, तुरे, कापड, झाडू, रांगोळी इत्यादीपर्यंत सर्व व्यावसायिकांचा व्यवसाय चलतीत असतो. या निमित्ताने खूप मोठी आर्थिक उलाढाल भारतात होते आणि संपूर्ण अर्थव्यवस्था सकारात्मक पद्धतीने ढवळून निघते.

बलिप्रतिपदेला म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला अमृतसर येथे सुवर्णमंदिराची स्थापना करण्यात आली. शीख लोक हा सण भव्य प्रमाणात साजरा करतात. दक्षिण भारतात बलिप्रतिपदेला रेड्याच्या टकरी लावतात. गायी-बैलांच्या मिरवणुका काढतात. गोव्याकडे शेजारी आणि नातेवाईकांना घरी बोलावून दूध, गूळ, पोहे व फराळ देतात. या सर्वांचा अर्थ एकच की, दिवाळीला एकत्र जमून एकमेकांना भेटी देऊन आपला स्नेह व्यक्त करणे. हा दिवस एक उत्तम दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कुठलेली शुभ काम आवर्जून केले जाते.

प्रभू श्रीरामांना या शुभमुहूर्तावर राज्याभिषेक करण्यात आला. देवी पार्वतीने या दिवशी भगवान महादेवाला द्युतात हरविले. म्हणून या दिवसाला द्यूतप्रतिपदा असेही नाव आहे. या दिवशी द्यूत खेळण्याची पद्धत आहे. याच दिवशी विक्रमादित्य राजाने विक्रम संवत्सराचा प्रारंभ केला. साडेतीन मुहूर्तातील अर्धा मुहूर्ताचा मान या दिवसाला आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीला औक्षण करते. काही ठिकाणी मुलगी आपल्या वडिलांना औक्षण करते. यामागील कारणपंरपरा अशी असावी की, जो आपला रक्षणकर्ता असतो, त्याच्या मंगल कामनेकरिता मनोभावे त्याला औक्षण करीत असावे आणि त्याच्याविषयी कृतज्ञ भाव कायम राहावा. आपला प्रत्येक सण हा कोणत्या ना कोणत्या नात्याशी संबंधित आहे. यावरून हेच स्पष्ट होते की, आपल्या संस्कृतीत कुटुंबसंस्था, नातेसंबंध याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज नवीन पिढीला ते पटवून देणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे कदाचित पुन्हा नव्याने आपण एकमेकांशी बांधले जाऊ.

SCROLL FOR NEXT