Latest

District Bank Election : बिनविरोधसाठी प्रत्येकी दोन जागांचा पर्याय! आणि नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम

Arun Patil

कोल्हापूर ; विकास कांबळे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (District Bank Election) निवडणूक बिनविरोध करण्याच्या द‍ृष्टीने आता पर्याय देण्यात येऊ लागले आहेत. पहिल्या टप्प्यात सर्वांना प्रत्येकी दोन-दोन जागांवर तोडगा काढण्याचा नेत्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. परंतु, गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्या निवडणुकीत ज्या पक्षात एखादी व्यक्‍ती होती त्या व्यक्‍तीने आता पक्ष बदलला आहे. सध्या दुसर्‍या पक्षात या व्यक्‍ती आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्या पक्षाचे सभासद मानायचे, हा कळीचा मुद्दा बनला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (District Bank Election) जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील विकास संस्था गटातील जांगांबाबत बर्‍यापैकी चित्र स्पष्ट होत आले आहे. राहिलेल्या 9 जागांचा प्रश्‍न आहे. 'गोकुळ'च्या निवडणुकीत जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे आ. विनय कोरे हे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आघाडीसोबत होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आ. प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी आ. कोरे यांच्यावर, तर माजी आ. महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी आ. पी. एन. पाटील यांच्यावर सोपविण्यात आली.

जिल्हा बँकेची संपूर्ण निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचे बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेकवेळा बोलून दाखविले आहे. तरीदेखील ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांना सोबत घेऊन ते प्रयत्न करत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे नेते खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आवाडे, आ. विनय कोरे हे प्रमुख नेते आहेत. यातील अपवाद वगळता सर्वजण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आहेत. सध्या बँकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणूक टाळण्यासाठी सर्वांना सोबत घेण्याचे ठरविले असून, त्यानुसार चर्चा सुरू आहेत.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आतापर्यंत निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू आहे. परंतु, आता पर्याय देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दोन-दोन जागा देण्याचा पर्याय पुढे आला आहे. काँग्रेसला दोन, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन, शिवसेनेला दोन आणि आ. कोरे व आ. आवाडे या दोघांत मिळून दोन जागा, असा पर्याय पुढे आला आहे. एक जागा शिल्‍लक राहते ती माजी खा. राजू शेट्टी यांना देण्याबाबतचा पर्याय पुढे आला आहे. शेट्टी यांना उमेदवारी दिल्यास शिरोळमधील जागेबाबत सध्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व गणपतराव पाटील यांच्यातील वादाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, अशी नेत्यांना आशा आहे. त्यामुळे या पर्यायाला कितपत प्रतिसाद मिळतो, हे माघारीपर्यंत पाहावयास मिळेल.

नऊ जागांसाठी चुरस

महिला, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, कृषी पणन, शेतीमाल प्रक्रिया संस्था, नागरी सहकारी बँक पतसंस्था, इतर शेती संस्था व व्यक्‍ती सभासद या गटांतून 9 जागा निवडून द्यावयाच्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस आहे.

इच्छुकांची मनधरणी करताना नेत्यांचा कस

कोल्हापूर ; एकनाथ नाईक : जिल्ह्याची 'अर्थवाहिनी' म्हणून ओखळल्या जाणार्‍या जिल्हा बँकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी नेते कामाला लागले आहेत. या निवडणुकीत सेवा संस्था गटातून 12 जागांवर नेत्यांची निवड बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत; पण उर्वरित 9 जागांसाठी दाखल झालेल्या विक्रमी उमेदवारी अर्जांमुळे कोणाला थांबवायचे आणि कोणाला चाल द्यायची, यासाठी नेते मंडळींचा खल सुरू आहे. 'तुम्हाला अन्य ठिकाणी संधी देतोय, जिल्हा बँकेचा उमेदवारी अर्ज मागे घ्या. माझा शब्द तुम्हाला मानावा लागेल.' यासह पडद्यामागील घडामोडी वेगावल्या आहेत.

जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 21 जागांसाठी विक्रमी 268 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. छाननीनंतर 226 उमेदवार रिंगणात आहेत. सेवा संस्था गटातील 12 जागांपैकी गगनबावडा तालुक्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. अन्य तालुक्यांतील या गटातील जागा बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे.

उर्वरित 9 जगांसाठी राखीव गटासह महिला गटातूनही अर्जांची संख्या मोठी आहे. 9 जागांमधील एखादी जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठीदेखील जिल्ह्यातील छोटे-मोठे गट एकवटले आहेत. त्यामुळे येथे चुरस वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा 21 डिसेंबर अखेरचा दिवस आहे.

'करेक्ट' कार्यक्रम

कार्यकर्त्यांच्या जमेच्या आणि कमकुवत बाजू नेत्यांना माहिती आहेत. त्यामुळे कोणाला कोठे गाठायचे, कोणती खिंड आडवायची, हे नेत्यांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इच्छुकांना थेट भेटून त्यांना विविध प्रकारची आश्‍वासने देत उमेदवारी माघार घेण्यासाठी 'करेक्ट' कार्यक्रम सुरू झाला आहे.

SCROLL FOR NEXT