पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून एलजेपी (रामविलास) प्रमुख चिराग पासवान एनडीए सोडून इंडिया आघाडीत सामील होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. चिराग पासवान यांना त्यांच्या इच्छेनुसार जागा मिळत नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती, मात्र आज या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. चिराग पासवान यांनी आज (दि. १३) भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबतचा जागावाटपचा फॉर्म्युल अंतिम झाल्याची माहिती दिली आहे.
भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पासवान यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, एनडीएचा सदस्य या नात्याने, आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, आम्ही एकत्रितपणे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील जागावाटपाला अंतिम रूप दिले आहे. योग्य वेळी याबाबतची घोषणा केली जाईल," असे पासवान यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मला युतीमध्ये नेहमीच मानाचे स्थान दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानायचे आहेत. त्यांनी रामविलास पासवान यांना नेहमीच आपले मित्र मानले आहे. आज पुन्हा आम्ही आमची जुनी आघाडी मजबूत केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप झाल्यानंतर, मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानू इच्छितो. येत्या काही दिवसांत एलजेपी निवडणुका लढवेल या उद्देशाने बिहारमधील सर्व 40 जागा एनडीए आघाडीने जिंकल्या पाहिजेत आणि 400 जागांचे लक्ष्य गाठले पाहिजे." असा विश्वास पासवान यांनी व्यक्त केला.