Latest

Ashni Crater : चौकुळ येथे आढळले हजारो वर्षापुर्वीचे ‘अशनी विवर’; कोकणातील नव्या रहस्यांचा होणार उलगडा

अमृता चौगुले

आंबोली (सिंधुदुर्ग); निर्णय राऊत : जगातील एकमेव खडकातील (कातळ) विशिष्ट अशा अशनी विवरचा भूवैज्ञानिक डॉ.अतुल जेठे व सहकारी प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी चौकुळ येथील खमदादेव पठार (खमद्याचा पठार) येथे शोध लावला आहे. त्याचे नामकारण "रजतकृष्ण" असे करण्यात आले असून येत्या काही दिवसात सदर अशनी विवराचा सखोल अभ्यासाने व संशोधनाने माहिती पुढे येईल. त्यामुळे हे जगातील एकमेव असे अद्भुत 'अशनी विवर' म्हणून ओळखले जाईल अशी शक्यता आहे. (Ashni Crater)

उल्का, अशनी म्हणजेच मोठे उल्काभ अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणातून येताना पूर्ण जळून जाण्यापूर्वीच पृथ्वीवर पडतात. अशा अपार्थिव पदार्थांना 'अशनी' म्हणतात. उल्काभांच्या मानाने अशनींची संख्या अल्प असते, कारण बहुसंख्य उल्काभ वातावरणातच जळून जातात. पृथ्वीवर ते क्वचितच आढळतात. सामान्यत: उल्कावृष्टी होते तेव्हा अशनी पडत नाही. अशनी एकटा पडतो किंवा वातावरणात फुटून अनेक तुकडेही पडतात. कधी कधी अशनीच्या आघाताने भूपृष्ठावर विवर निर्माण होते. ॲरिझोनातील अशनिविवर व लोणार सरोवर ही याची ठळक उदाहरणे आहेत. (Ashni Crater)

असा लागला शोध… (Ashni Crater)

चौकुळ परिसरात विविध महत्वप्राप्त पठारे, गुहा तसेच धार्मिक स्थळे आहेत. त्यातील खमद्याचे पठार नावाने ओळखल्या जाणाऱ्या याच पठारावर शिरूर(पुणे) येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.अतुल जेठे यांनी त्यांच्या सोर्स नुसार माहिती घेत येथील सॅटेलाईट छायाचित्रे मार्फत विशिष्ट विवराचा आकार पाहिला होता. तर डॉ.अतुल जेठे हे आपल्या संशोधनासाठी प्रख्यात असल्याने त्यांनी त्यावर प्राथमिक दृष्ट्या सॅटेलाईट छायाचित्रे पाहिल्यावर त्यांना सदर विशिष्ट आकार हा अशनी विवर संबंधित असल्याचे खात्री झाली. त्यानंतर त्यांचे सोबती प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्यासह नुकतीच या खामद्याच्या पठार परिसरातला भेट दिली असता पश्चिम घाटातील या पठारावर सुमारे पन्नास ते सत्तर हजार वर्षापूर्वी तयार झालेले अशनी विवर असल्याचे प्राथमिक दृष्ट्या त्यांनी पुष्टी केले. अन् हे अशनी विवर असलेला परिसर पाहता या विवरा बद्दल होणाऱ्या संशोधनात विविध आणि आश्चर्यकारक महत्वपूर्ण गोष्टी समोर येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

अशनी विवरावर प्रा. डॉ. अतुल जेठे यांनी दिलेल्या माहिती नुसार चौकुळ येथील आज असलेल्या खमदादेव मंदिरापासुन पूर्वेकडे सुमारे ५०० मीटर अंतरावर सुमारे पन्नास हजारहून अधिक वर्षापूर्वी आकाशातून एक पेटता अशनी येऊन येथील जांभ्या खडकाच्या कठीण पठारावर कोसळला व त्यामुळे वर्तुळाकार आकाराचे विवर तयार झाले. आज या विवरात काळसर -पिवळट रंगाची माती व त्यावर पावसाळ्यात उगवणारे गवत यांचे अस्तित्व आहे. पावसाळ्यात येथील परिसरात सर्वात जास्त पाऊस पडतो. तर या विवराच्या ईशान्य दिशेकडून विवरातील पाणी वाहून जाते. या विवराचा पूर्व -पश्चिम व्यास सुमारे १८० मीटर तर उत्तर-दक्षिण सुमारे २२० मीटर असुन विवराचा परिघ सुमारे ५२५ मीटर आहे. या विवराचा अधिक अभ्यास व संशोधन करण्यासाठी आपण या मे महिण्याच्या शेवटी पुन्हा भेट देणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली. तसेच या स्थळाला शासनाने 'अति संवेदनाशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन' म्हणून संक्षित करावे अशी मागणी देखील डॉ. जेठे यांनी केली आहे.

भौगोलिक स्थान!

या विवराचे पृथ्वीवरील भौगोलिक स्थान १५ अंश ५२ मिनिटे व ३९.५ सेकंद उत्तर अक्षवृत्त ते ७४अंश १ मिनिट ५४.५ सेकंद पूर्व रेखावृत्त असे आहे. समुद्र सपाटीपासुन हा भाग सुमारे ६३० मीटर उंचीवर आहे. घटप्रभा व कृष्णा या नद्यांच्या जोडणारी' देवाची न्हय'ही नदी पूर्वेकडून पावसाळ्यात वहाते. तसेच भारतातीलच नव्हे; तर जगातील जांभ्या खडकावरील (Laterite Rock) कातळसड्यावरील हे एकमेव विवर ठरण्याची शक्यता डॉ.अतुल जेठे यांनी वर्तवली. याला शास्त्रीय परिभाषेत 'सिम्पल बाऊल क्रेटर' म्हणजेच 'साधे वर्तृळाकृती विवर'असे म्हणतात. आंबोली परिसरात सर्वात जास्त पाऊस या भागात पडत असल्याने वातावरणातून अतिगतिमान अशनीचा आघात झाल्यावर वर उसळून आलेली कड (Ejecta- Blanket) मृदेच्या धूपेमुळे नष्ट झाली असावी. अशी शक्यता देखील डॉ.अतुल जेठे यांनी वर्तवली.

असे आहे खमद्याचे पठार!

प्रसिद्ध अशा खमदादेव पठार हे पूर्वी पासूनच वैशिष्टपूर्ण आहे. नजर जाईल एवढे विस्तृत हे पठार असून तेथे पवित्र खमदादेवाचे मंदिर आहे. याच खमदादेव नावानेच हे पठार ओळखले जाते. मुख्य रस्ता पासून अवघे काही मीटरवर हे पठार असून पावसाळ्यात येथे जैवविविधतेचे विविध घटक सहज (जीव व वनस्पती) आढळतात. तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात विविध प्रजातीची रानफुलेही येथे पाहायला मिळतात. त्यामुळे पर्यटक सुद्धा येथे व्हिजीट करत असतात. येथे पुरातन देवाची तलाव सुद्धा आहेत. मंदिराच्या समोरच दोन वर्तुळकार एक मोठ्या तर एक लहान आकाराची तळी (तलाव) आहे. यातील एका तळीत पाणी पाहायला मिळते तर दूसरी तळी ही नेहमी बीना पाण्याची असते. तीच बीना पाण्याची मोठी तळी, जीचा आता अशनी विवर म्हणून शोध लागला आहे. त्याचेच रजतकृष्ण नुकतेच असे नामकरण करण्यात आले आहे. तर येत्या काही दिवसात अशनी विवर हे पूर्णतः सिद्ध झाल्यास आंबोली – चौकुळ – गेळे परिसरात अन्य काही खगोलीय घटना किंवा पुरातन मानवी संस्कृति याचा शोध घेणे आवश्यक आहे.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT