Latest

रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत भाजपात नाराजी

दिनेश चोरगे

रत्नागिरी : रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत भाजपाच्या नेत्यांमध्ये 'सूर नाराजीचा' कार्यक्रम सुरू आहे. जे नाराज नेते आहेत. त्यांना शिवसेना नेते तथा पालकमंत्री सामंत यांचा आधार वाटत आहे. ज्या भाजपच्या मंत्री असलेल्या नेत्यामुळे नाराजी आहे, त्यांच्यासह इतर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर राजकीय वार करण्यास पालकमंत्र्यांना आयती संधी मिळत आहे. कारण ना. सामंत आणि भाजप नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामध्येही राजकीय शीतयुद्ध सुरू आहे.

भाजपचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना निवासस्थानी येऊन भेटण्याची विनंती केली. अशोक मयेकर हे माजी आमदार बाळ माने यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. परंतु बाळ माने ना. सामंत यांचे विरोधक म्हणून काम करतात. माजी नगराध्यक्ष मयेकर यांचे सुपुत्र संकेत मयेकर यांना शहर युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. बाळ माने यांनी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्याकडे शिफारस केली. जिल्हाध्यक्ष सावंत हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या मान्यतेशिवाय पदाधिकारी नियुक्ती होत नाही. त्यामुळे ना. चव्हाण यांनीच मयेकर यांच्या मुलाच्या अध्यक्षपदाला विरोध दर्शविला असावा, असा समज झाला. त्यानंतरच भाजपच्या माजी नगराध्यक्षांनी पालकमंत्र्यांना निवासस्थानी निमंत्रित केले. त्यानुसार पालकमंत्र्यांनीसुद्धा त्यांच्या घरी जाऊन तासभर चर्चा केली. यातून पालकमंत्र्यांनी स्थानिक नेते बाळ माने यांच्यासह बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनाही चेकमेट करण्याची संधी मिळाली. पालकमंत्री उदय सामंत आणि बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे राजकीय वैर आहे.

पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांना भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे नेते नीलेश राणे यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नव्हते. नीलेश राणे यांचे वडील नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. बंधू आमदार नितेश राणे भाजपचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे नीलेश राणे यांना पक्षात घुसमट केली जात असतानाही त्यांचा मूळ आक्रमक स्वभाव व्यक्त होत नव्हता. त्यामुळे त्यांनी राजकीय निवृत्ती घेण्याचा निर्णय केला होता. परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत घातल्यानंतर नीलेश राणे यांनी माघार घेतली. त्यांनीही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. ना. सामंत यांनी त्यांना आधार दिला.

राजकीय शीतयुद्ध…

राणे व मयेकर यांची नाराजी विचारात घेता भाजपच्या नाराज नेत्यांना उद्योगमंत्र्यांचा आधार मिळत आहे. याच आधारातून ना. सामंत यांचे राजकीय विरोधक असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसह स्थानिक नेते बाळ माने यांच्यावर राजकीय वार करण्याची संधी मिळाली आहे.

SCROLL FOR NEXT