Latest

बिबट्याच्या समस्येवर लवकरच बैठक, वळसे पाटील यांची माहिती; जांबुत येथे नरवडे कुटुंबाची घेतली भेट

अमृता चौगुले

पिंपरखेड, पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या पूजा नरवडेच्या कुटुंबाची भेट घेऊन माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. या घटनेची सर्व माहिती संकलित झाल्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी मुंबई येथे बैठक आयोजित करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

वळसे पाटील यांनी या वेळी वन विभागाच्या अधिकार्‍यांकडून घटनेची माहिती घेतली. या परिसरात बिबट्याची वाढती संख्या चिंताजनक असून, यासंदर्भात अधिकार्‍यांना त्यांनी सूचना केल्या. या भागात ऊसपीक मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट लपणक्षेत्र उपब्लध होते तसेच सध्या त्यांना भक्ष्य मिळत नसल्याने बिबटे मानवावर हल्ले करायला लागले आहेत. जांबुत येथील घटना घडली त्या वेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व त्यांचे सचिव यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

या घटनेची सर्व माहिती संकलित झाल्यानंतर यासंदर्भात पुढची उपाययोजना करण्यासाठी मुंबई येथे लवकरच बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असे या वेळी वळसे पाटील यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात वीजपुरवठा वेळापत्रक हे मुंबई येथूनच ठरविले जाते. त्यामुळे दिवसा विजेची मागणी मंजूर होणे कठीण असल्याचे या वेळी वळसे पाटील यांनी सांगितले. मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मंगेश चव्हाण या तरुणाचीही वळसे पाटील यांनी भेट घेऊन हल्ल्याच्या घटनेची माहिती घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मयत पूजा नरवडे हिच्या कुटुंबाला 51 हजार रुपयांची मदत दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते भगवान नरवडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, माजी सरपंच दामू घोडे, विश्वास कोहकडे, राजेंद्र गावडे, काठापूर सरपंच बिपीन थिटे, सरपंच दत्ता जोरी, बाळासाहेब पठारे, बाळासाहेब फिरोदिया आदी
उपस्थित होते.

साध्या ड्रोनच्या माध्यमातून शोध घेणे अवघड जात असून, बिबट्याचा शोध घेण्यासाठी आजच वाइल्ड लाइफच्या माध्यमातून थर्मल ड्रोनद्वारे शोध घेणे सुरू करण्यात येणार आहे.
– अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT