Latest

Kunbi Maratha Records : मराठा म्हणजे कुणबीच नोंद सापडली?

मोहन कारंडे

मांजर्ड : विलास साळुंखे : कुणबी म्हणजे मराठाच असल्याचे ऐतिहासिक पुराव्यानिशी शिक्कामोर्तब झाल्याचा दावा केला जात आहे. तशी नोंद तासगाव तालुक्यात चिखलगोठण गावात सापडली आहे. यामध्ये कुणबी म्हणजे मराठा असल्याची स्पष्ट नोंद आहे.

चिखलगोठण गावात मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे सिद्ध करणारी कागदपत्रे मोडी लिपीमध्ये सापडली आहेत. या कागदपत्रांनुसार, 'जाई कोम रामा बुरलीकर इचा मुलगा आनंदा रामा चौगुला' यांच्या नावापुढे कुणबी म्हणजे मराठा अशी नोंद १८८९ सालची सापडली आहे. ही नोंद मोडी लिपीचे वाचक आशिष शिंदे यांनी प्रमाणित केली आहे. तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी नोंद सापडल्याबाबत दुजोरा दिला आहे.

याबाबत मोडी लिपी अभ्यासक आशिष शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८८९ मध्ये गावात दोन नोंदी सापडल्या, त्यापैकी शेवटची नोंद कुणबी म्हणजे मराठा असून, त्यापुढील सर्व नोंदी मराठा अशाच आहेत. गावात ८० नोंदी सापडल्या आहेत.

कुणबी म्हणजे मराठा : डॉ. श्रीमंत कोकाटे

याबाबत डॉ. श्रीमंत कोकाटे म्हणाले, राज्यात कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत, असे अनेक वर्षापासून अनेक अभ्यासक सांगत आहेत. या पुराव्याने कुणबी म्हणजे मराठा यावर शिक्कामोर्तब केले. इतका अस्सल पुरावा आजपर्यंत सापडला नव्हता. हा राज्यातील पहिलाच महसुली पुरावा आहे.

१) तासगाव/सांगलीमध्ये १८८९ ची जन्म-मृत्यू रजिस्टरला नोंद सापडली… कुणबी म्हणजे मराठा.
२) हैदराबाद स्टेटच्या १९०९ साली प्रकाशित झालेल्या गॅझेटनुसार मराठवाड्यातील लोकसंख्येच्या ३९ टक्के समाज कुणबी आहे.
३) १९२१ साली मुंबई उच्च न्यायलयाने मराठा व कुणबी एकच असा निवाडा दिला आहे.
४) १९९७ साली औरंगाबाद जातपडताळणी समितीने मराठा व कुणबी एकच आहेत, असा निकाल दिला आहे.

तासगाव तालुक्यात सापडलेली कुणबी म्हणजे मराठा ही नोंद मराठा आरक्षणासाठी एक महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा आहे. अशाप्रकारची नोंद महसूल विभागात प्रथमच सापडली आहे. या नोंदीनुसार, राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी गेवराई-बीड येथील अभ्यासक डॉ. उद्धव घोडके-पाटील यांनी केली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT