धुळे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावानजीक वेगाने जाणाऱ्या डंपरने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना आज घडली आहे. या भीषण अपघातात आठ जण ठार झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटना स्थळावर पोलीस प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावा नजीक हा भीषण अपघात घडला आहे. पळसनेर गावाकडे येणा-या डंपरवरून अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा डंपर महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी कार तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर आदळला. यानंतर हा डंपर रस्त्याच्या कडेला उलटला. हा अपघात नंबरचे ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज असून अपघातात चालक देखील ठार झाल्याची माहिती पुढे येते आहे. या अपघातामध्ये 15 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने धुळे येथील सर्वोच्च रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे या अपघातात 8 जण ठार झाले असून त्यांना उत्तरीय तपासणीसाठी शिरपूर येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आणखी 13 जखमींना शिरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर पोलिस अधीक्षक संजय बारकुंड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह शिरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन हिरे आणि अन्य पोलीस दल यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी गोळा झाल्यामुळे मदत करायला अडचणी निर्माण झाल्या आहेत.